कोरोना अवतार....
कोरोना अवतार....


काय भ्यायचं कोरोनाला देवदूतच तो
विष्णुचा अकरावा अवतार रुपच तो।
जेव्हा केव्हा धरतीवर उतू जातं पाप
कान धरायला वरुन यावा लागतो बाप।
निसर्गाच्या र्हासाबद्दल मुळी खेद नव्हता
पाप काय पुण्य काय विधिनिषेध नव्हता।
झालं ते तर अटळ होतं भरली होती वेळ
वाईटातून चांगलं निघतं निसर्गाचा खेळ।
रस्ते पडले ओस गाडीघोडा झाला ठप्प
आपसूकच प्रदूषणाचा प्रश्न झाला गप्प।
सक्तीमुळे भितीमुळे घरात रहातो हल्ली
गालात हसते बायको खुशीत चिल्लीपिल्ली।
गर्दी टाळू म्हणून सार्या पार्ट्या केल्या बंद
पत्नीसोबत चहापानात सामावला आनंद।
मांस मच्छी वर्ज्य आता साधाच वरणभात
अमृताची रुची गवसली सखीच्याच हातात।
शयनापूर्वी देवापुढे हात जोडून साकडं
पुन्हा नाही आता पाऊल टाकणार वाकडं।
हस्तांदोलन गळाभेट या पाश्चात्यांच्या तर्हा
दोन हात अंतरावरुन आपला नमस्कार बरा।
आपसूक हिंदू धर्म कसा महान ठरला पाहा
याच्या चालीरीतींची तुम्ही कास धरुन राहा।
या निमित्ते भुईवरचा जरा हलका झाला भार
विषाणु नव्हे विष्णु म्हणा हा कोरोना अवतार।