कळलंच नाही बापा तू माय झालास
कळलंच नाही बापा तू माय झालास

जन्माला आलो तेव्हा सगळेच आनंदात होते,
पैसे नसतानाही तू हळूच पेढे घेवून आलास..
बापा कळलंच नाही रे कधी तू माझी माय झालास..
हळूहळू मोठा झालो, मुखातून पहिला शब्द आई काढला
पण कोण जाणे त्या क्षणी मुखात बाबा तू का नाही आलास,
बापा कळलंच नाही रे कधी तू माझी माय झालास..
पाठीवर बसवायचास, अंगाखांद्यावर खेळवायचास,
माझे घट्ट पकडलेले बोट कधी तू सुटू नाही दिलास,
बापा कळलंच नाही रे कधी तू माझी माय झालास..
दुःख सदैव तुझ्या सोबत असायचे, तू नेहमीच हसत राहीलास,
हा संसाराचा गाडा बापा तू आयुष्यभर ओढत राहीलास
बापा कळलंच नाही रे कधी तू माझी माय झालास..
जरी पोटात नाही वाढवलं, पण हाताचा पाळणा केलास,
माझ्या सुखापायी तू तुझं जगणं विसरून गेलास,
बापा कळलंच नाही रे कधी तू माझी माय झालास..
असंख्य वादळ झेलुनही तू सावली देत उभा होतास,
बाबा तुझ्यातच रे मी आजपर्यंत देव पाहीला,
बापा कळलंच नाही रे कधी तू माझी माय झाला..
आमच्यासाठी इतरांसमोर वाकत राहीला,
दुःखाचे घोट एकटाच घोटत राहीला..
माझ्या सुखापोटी आतल्या आत तळमळत राहिलास..
बापा कळलंच नाही रे कधी तू माझी माय झालास..
बापा नको रे श्रीमंती, नको मान पान, तुझ्या मायेने फुलेल माझं जीवन,
कधी मागं स्वतःसाठी काही, नेहमी इतरांसाठी मागत आलास..
बापा कळलंच नाही रे कधी तू माझी माय झालास..