कात्यायनी देवी
कात्यायनी देवी
सहावे रूप दुर्गेचे कात्यायनी,पहा तेजःपुंज,चार भुजाधारी.
अभयमुद्रा,वरमुद्रा तिच्या उजव्या हातामध्ये अन् डाव्या
हातामध्ये तलवार आणि कमळाचे फूल असून तिचे वाहन सिंह आहे.
ब्रजमंडळाच्या अधिष्ठात्रीच्या रूपात देवी प्रतिष्ठित असते
उपासकाला अर्थ, धर्म, काम, मोक्ष याची प्राप्ती सुलभ करते.
या दिवशी साधकाचे मन 'आज्ञा' या चक्रात स्थिर असल्याने योगसाधनेला त्याचे विशेष स्थान असते.
कत नावाचे होते प्रसिद्ध महर्षी त्यांना कात्य नावाचा पुत्र होता.
या कात्याच्या गोत्रात प्रसिद्ध महर्षी कात्यायनाचा जन्म झाला.
केली त्यांने कठोर तपस्या भगवतीची नि भगवतीने त्याच्या घरी जन्म घ्यावा अशी केली विनवणी.
महिषासुराचा अत्याचार पृथ्वीवर वाढल्याने त्याच्या विनाशासाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी आपल्या तेजाचा
अंश देऊन केली देवी प्रगट.
महर्षी कात्यायनाने या देवीची सर्वप्रथम पूजा केली म्हणून या देवीला 'कात्यायनी' नाव पडले. महर्षीच्या घरी तीन दिन सप्तमी, अष्टमी नि नवमी पूजा ग्रहण करुनी कात्यायनीने महिषासुराचा वध केला दशमीला.
रंग हिरवा समृध्दीचा, सरळ सुलभ मार्गाचा ,शिवार शेतीचा, नववधूच्या हिरव्या चुड्याचा. निसर्गातल्या हिरव्या सृष्टीचा, प्रसन्न वातावरणाचा, चैतन्याचे प्रतिक असलेला.
मनोभावाने करू पूजन कात्यायनी देवीचे अर्पुया नैवेद्य
मालपुवाचा देवीस प्रसन्न करावया.
