जयराम
जयराम


पाऊस धो-धो कोसळत होता
जयराम हातात झेंडा घेऊन,
बेंबीच्या देठापासून मोर्चात ओरडत होता
'अमुक...अमुक...' यांचा विजय असो !
'फलानं...फलानं... झालंच पाहिजे !'
'झिंदाबाद... झिंदाबाद... अमुक... अमुक... झिंदाबाद !'
घोषणांचा निनाद आसमंतात घुमत होता
अन मोर्चेकऱ्यांना पाऊस भिजवत होता
इतक्यात एकजण जयरामला म्हणाला,
'अरे जयराम, तु इथं काय करतोस?
जा घरी लवकर, तुझं मूल सिरीयस हाय !' जयराम क्षणभर स्तब्ध, निशब्द !
घरी येऊन पाहतो तर काय !
मुलं भिजलेलं...कायमचंच निजलेलं...
त्याला छातीशी कवटाळून हंबरडा फोडणारी अर्धांगिनी
अन् गटांगळ्या खाणाऱ्या...बुडणाऱ्या संसाराकडं पहात
तिच्या चहुबाजूंनी जमलेले निर्विकार चेहरे !
आता पाऊस धो-धो कोसळत होता मुसळधार
जयरामच्या डोळ्यातून आभाळ फाटल्यागत !अन त्याच्या घरावरचा झेंडा फडफडतोय
काहीही न झाल्याच्या अर्विभावात...
दुसऱ्या जयरामच्या शोधात...!