जरी नशिबाने जाळले
जरी नशिबाने जाळले
नाही श्रीमंतीचा थाट
नाही कपड्यांचा घाट,
शोधतो आम्ही ती वाट
जी दावेल ऊब मायेची ॥१॥
साध्या भाकरीची कोर
कमावाया लागे घोर,
जसा व्याकुळ चकोर
मुठभर चांदण्यांसाठी ॥२॥
कडाक्याची जरी थंडी
नाही आमच्याकडे बंडी,
झाकतो तुटलेली मांडी
मळक्या चिंधी-लत्त्याने ॥३॥
अज्ञानाचा उभा तिढा
रांधा, वाढा, उष्टी काढा,
हाच आहे जीवनी पाढा
सदोदित आमच्या मागे ॥४॥
झोपडीच्या या कुशीत
झोप मिळते ती शांत,
विझू नाही दिली वात
जरी नशिबाने जाळले ॥५॥
