तुझी आठवण....
तुझी आठवण....
तुझी आठवण होती आली
उगा पापणी फडफड झाली
श्वास रोखला येता जाता
नदी तटावर गर्दी झाली
खुळी पाखरे भिरभिर करती
मिटून कवाडे उगाच झरती
कोरड पडली भिजता भिजता
आत उसासे मुसमुस वरती
बागेमधल्या झोपाळ्यावर
कुणीच नव्हते त्या माळ्यावर
थरथर कापत हात पकडला
मन आकाशी तन ताळ्यावर
भेटी-गाठी फुलू लागल्या
ओठ पाकळ्या खुलू लागल्या
झुला बांधला स्वप्नांचा तो
अस्मानी तो झुलू लागला
एक न होणे कळले होते
घर स्वप्नाचे जळले होते
वाट बदलली हात सुटेना
घन ओथंबून रडले होते
बंद कपाटी जपून ठेवले
कुलूप लावी कडीच नाही
खटखट अविरत दारावरती
उघडणार मी कधीच नाही
नको वाटतो देह पसारा
पाणी सरले रिता किनारा
लाट होऊनी कवेत घे मज
मिटवून टाक खेळच सारा...
