स्वयंपाकघर
स्वयंपाकघर
1 min
251
घर सारे माझे निजले
वातीही जागत नाही
स्वयंपाकघराचा मग
का डोळा लागत नाही
विझलेली चूल कधीची
ओटा सारवला आहे
भांडी शिक्यातली उपडी
थकवा आवरला आहे
प्रेमात पहुडले सारे
नाही कसलीही चिंता
बरण्या काचेतुन बघती
उठल्यावर सारा गुंता
कढईच्या देहावरती
वृद्धत्व रेषा दिसती
कलई सरली गंजाची
परि खोड काढुनी हसती
वेड्या चावट चमच्यांची
कुजबुज मावणार नाही
रात्री जमलेले सगळे
दिवसा गावणार नाही
पेंगत असतांना सारे
ते काही मागत नाही
स्वयंपाकघराचा मग
का डोळा लागत नाही
