STORYMIRROR

Sirajuddin Momin

Romance Tragedy

4  

Sirajuddin Momin

Romance Tragedy

दिवस : प्रेमाचे

दिवस : प्रेमाचे

1 min
425

कधी अंतरात उठत राहिलेला, भावभिना कल्लोळ

कधी गावभर पसरलेला, झंझावती गदारोळ

तरी कसे कोठून मनाला असीम बळ मिळालेले 

असेच असतात काय आठव 

काळजात खोल खोल रुजलेले 


कधी मकरंदाने ओंथबलेले संपृक्त मोहोळ

आणि अर्ध्या वाटेवर भेटलेले घोंघावणारे वादळ

परी दुर्दम्य आवेशाने दोन हात केलेले

असेच असतात काय 

आठव काळजात खोल खोल रुजलेले


कधी प्राजक्तपुष्पांच्या पायाशी पडलेला सुगंधी सडा

कधी सैरभैर मनाने शोध घेतलेला व्याकूळ छडा

तेव्हा सैरावैरा धावताना काट्यांचे भान नसलेले 

असेच असतात काय 

आठव काळजात खोल खोल रुजलेले


कधी गुलकंद घातलेला पानांचा मिठास विडा

कधी काळीज करकचून टाकणाऱ्या बंधनाचा तिढा 

तरी अपराजय जिगीषेने भावविश्व साकारलेले

असेच असतात काय

आठव काळजात खोल खोल रुजलेले


कधी रात्री जागवणारा जीवघेणा जागर 

कधी पंखात बळ भरणारा अथांग सागर

आणि बेभानपणे आयुष्य झोकून दिलेले 

असेच असतात काय

आठव काळजात खोल खोल रुजलेले


कधी कासावीस उरात दाटून आलेले गच्च मळभ

कधी लक्ष लक्ष तेजोबिंबांचे एक अंतहीन नभ

एका उत्कट स्वप्नाने जीवन सारे तेजाळलेले 

असेच असतात काय 

आठव काळजात खोल खोल रुजलेले


कधी जगण्याचे निमित्त गवसलेले आशयघन अंतराळ

तर कधी भोवताल वेढलेले जंगलातील वणव्याचे जाळ

तरी ते तेव्हाचे सुवर्णक्षण तावूनसुलाखून निघालेले

असेच असतात काय 

आठव काळजात खोल खोल रुजलेले


तिच्या आठवणींचे वर्षानुवर्षे जपलेले

अटळ असंख्य कोलाज

साक्षात सरकत राहतात

स्मृतीपटलावरून!

आजही!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance