STORYMIRROR

Somnath Ekhande

Tragedy Others

4  

Somnath Ekhande

Tragedy Others

धार कोसळतो बाप, माय पसरते बाहू

धार कोसळतो बाप, माय पसरते बाहू

1 min
432

पाण्या लागली तहान, आता कुणीकडे धावू? धार कोसळतो बाप, माय पसरते बाहू!!धृ!!


आला औंदाचा श्रावण, पूर जन्माचा घेऊन

सात जन्माची सोबती, गेली पुरात वाहून

नेली पुरानं लेकरं, आता कुणाकडं पाहू?

धार कोसळतो बाप, माय पसरते बाहू!!१!!


चंद्रमौळी झोपडीत, व्हतं गोकूळ थाटलं

सारं गिळलं पाण्यानं, जव्हा आभाळ फाटलं

गाळ साचल्या घरात आता कुणासाठी जाऊ?

धार कोसळतो बाप, माय पसरते बाहू!!२!!


दिलं बोटीत बसून, जाण्या सुखी पैलतीरी

कुशीतल्या पिल्लासह, माय गेली देवाघरी

येतो मनात विचार, जीव कुठं, कसा देऊ?

धार कोसळतो बाप, माय पसरते बाहू!!३!!


पाण्यावर तरंगते, गुरांसोबत दावण

गुरं ढोरं बांधायला, नाही उरली गव्हाण

दोघं सर्जा आणि राजा, गेले माझे सख्खे भाऊ

धार कोसळतो बाप, माय पसरते बाहू!!४!!


कधी वाटलं नव्हतं, माय बाप रूसतील

लेकरांच्या तळहाती, रेघा साऱ्या पुसतील

जड झालेल्या जीवाचा, भार कुठवरी वाहू?

धार कोसळतो बाप, माय पसरते बाहू!!५!!


पाण्या लागली तहान, आता कुणीकडे धावू?

धार कोसळतो बाप, माय पसरते बाहू...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy