STORYMIRROR

Somnath Ekhande

Inspirational Others Children

4  

Somnath Ekhande

Inspirational Others Children

श्रीमंत बालपण

श्रीमंत बालपण

1 min
266

काम करायला शेतं अन्

गुरं चारायला रानं होती


पत्रा -खापराच्या पाट्या

अन् जुन्या वह्यांची पानं होती


राहायला घराचा पत्ता होता

ल्यायला कपडा लत्ता होता


पोळा होता होळी होती

जतरा अन् दिवाळी होती


बटार बिस्किटं गोळ्या होत्या

सणावाराला पोळ्या होत्या


शिळीच भाकरी चहात चुरून 

सुकडी कधी गरम करून


लहान मोठे सगळे सारखे

खेळतानाही खिशात कोरके


थंडीत सासू जाळणं होतं

कुत्र्याची पिल्लं पाळणं होतं


वखरावरचं बसणं होतं

पडलं तरी हसणं होतं


उखुड्यावरच्या लढाया होत्या

छाती फुटस्तवर बढाया होत्या


रात रातभर फिरणं होतं

होळीच्या गवऱ्या चोरणं होते


गुढीची काठी पोळ्याची गुरं , डुबवायची बसून शिंगावर

दिवाळीआधी एक दिवस गोधड्या आपटायला कुंडावर

 

जत्रेच्या खर्चीसाठी मोहऱ्या नि एरंड्या 

खाऊ म्हणजे जिलेबी , गुडीशेव नि रेवड्या .


उन्हात वाळणाऱ्या कुरडयांच्या बाजेखालच्या मांगुड्यांची 

मज्जा होती माचीवरच्या आंबट-तुरट कांगुण्यांची


पाडव्याला चाफा अन् घटासाठी वडाची पानं

संक्रातीला ऊस बोरं दसऱ्यासाठी सोनं


आणलेलं सारं सारं आळीभर वाटायचं

शिमग्याला काठी घेऊन वीर म्हणून नटायचं


मेथीच्या जुड्या , शेवग्याच्या शेंगा 

डोक्यावर टोपलं नि गावभर पिंगा


भंगार आणि चपटीवर गारीगार यायचे

कांदे देऊन जांभुट्या नि करवंद घ्यायचे


कचाकडी चेंडू , हातात काठी स्टंपांसाठी शेणाची पाटी

टिन टिन टिलवरी , इट्टी दांडू , चिली पाटी ,सूर काठी


लग्नात लहान मुलांना कधीच पान नसायचं

पळत घरी जायचं अन् ताटली आणून बसायचं


खेळात लागलं , शाळेत मारलं घरी सांगत नव्हतो

फक्त एवढ्याच गोष्टीत खरं वागत नव्हतो

 

आई-बापाची गरीबी पण मोठं त्यांचं मन होतं

कुबेरालाही लाजवणारं श्रीमंत आमचं बालपण होतं?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational