जन्मभुमिसाठी..!
जन्मभुमिसाठी..!
ओळखलेस का तू मला,
मी अर्पीले होते या देहाला..!
यज्ञकुंडात या देशसेवेच्या,
मी स्वाहीले होते स्वतःला..!
मातृभूमीच्या रक्षणासाठी,
मी त्यागीले होते घरादाराला..!
म्हाताऱ्या त्या माय बापाला,
अन् प्रिय पत्नीच्या प्रेमाला..!
सुरकुतलेली कातडी लेऊन,
वाट पाहत होती माय माझी..!
काळजावर धोंडा ठेवून बाप,
काढत होता समजूत तिची..!
वाट पाहून थकले डोळे त्यांचे,
येईल बाळ आमचा म्हणत होते..!
नाही आला बाळ परतून त्यांचा,
सीमेवर रक्त त्याचे सांडले होते..!
ओली बाळंतीण बायको माझी,
मनात सुख स्वप्ने विणत होती..!
ऐकून बातमी माझ्या वीरगतीची,
डोळ्यात अश्रू लपवत होती..!
दहा दिवसांचे ते लेकरू तान्हे,
ना पाहिले मी त्याच्या मुखाला..!
टाकण्यापूर्वीच ते पाळण्यामध्ये,
पोरके झाले बापाच्या छत्राला..!
कंठ दाटला होता माय बापाचा,
पण पार्थिव पाहून ते रडले नव्हते..!
उर भरून आला अभिमानाने त्यांचा,
बलिदान जे देशासाठी मी दिले होते..!
आता एकच इच्छा असेल माझी,
घ्यावा जन्म त्याच जन्मदात्या पोटी..!
हा देह कामी यावा पुन्हा पुन्हा,
त्याच जननी अन् जन्मभुमिसाठी..!
