जगा मनमोकळे
जगा मनमोकळे
चालताना भर उन्हात
दिसले मला आयुष्य
झाडाखाली सावलीत
मानेखाली हात ठेवून
पहुडलेले आरामात,
बरे आहे बाबा तुझे
मस्त चाललय आराम
म्हंटल्यावर डोळे मिटूनच
विचारले त्याने ,
तुला काय खटकते आहे ?
कशाला एवढा चिडतो आहेस?
मनासारखे जगता येत नाही की
दुसरे आपल्यासारखे पिचत नाही
का नाही विचार करत चांगला ,
का नाही आवर घालत तू मनाला
अरे चालता चालता
गुण गुणावी एखादी ओळ,
नाहीतर नुसतेच हसावे
बाजूने जाणाऱ्या कडे बघून
वाळलेल्या पानावर चालून
त्याचा सुकलेला आवाज ऐका वा
उन्हातल्या सावलीला
अलगद जवळ करावे,
संकटांशी करावी मस्त हातमिळवणी
सुखाला म्हणावे ये येशील तेव्हा
मला काही नाही घाई
ना दुःख मी मानून घेत कसलेही
चंद्राला ही चुकले नाही भरती आणि ओहोटी
मग मी तर साधा एक मर्त्य मानव
बघ कळले तर घे समजून माझ्या बोलण्यातला अर्थ
नको घालवुस सुख दुःखासरख्या
क्षुद्र गोष्टीत आयुष्य व्यर्थ
