जादूचे घर
जादूचे घर
पाहिले मी एक असे जादूचे घर,
ज्याला नव्हता उंबरा पण दार भरपूर.
जिथे सर्व रडत येत होते,
अन् काही हसत बाहेर निघत.
कुणाचे आयुष्य संपत होते
माझ्या नजरेसमोर,
तर आप्त सगेसोयरे हंबरडा फोडत होते माझ्या डोळ्यासमोर.
कोणी पडत होते कोलमडून,
तर कोणी वाट पाहे जीवन संपण्याची.
कुणाला सापडली आजाराची चावी
तर कोणी झटत होते निरोगी होण्यासाठी.
कोणी पडत होते पाया
देव म्हणून त्या डॉक्टरांच्या,
तर कोणी नर्स कम्पाउंडरला
जोडत होते हात.
वाहत होता अश्रूंचा पूर
काही हळव्या डोळयातून,
तर काहींचे डोळ्यातील पाणीच
गेले होते आटून.
पण तरीही अनेकांचे प्राण वाचवणारे,
अनेकांना दिलासा देणारे,
जणू ते होते जादूचे घर.
जिथं सतत वाहत होता आणि
अखंड वाहतच राहील नंतर कधी पिडलेल्या, नडलेल्या,
तर कधी आनंदाने तुडुंब वाहणाऱ्या माणसांचा अखंड पूर
