भाऊबीज
भाऊबीज
दिवाळीचा सण आला
भाऊबीज आज आली,
माझ्या भाऊराया ची गाडी
अजून का नाही आली।।।
वाट पाहते दारात बसून
डोळे गेले थिजुन,
दिवस संपून गेला
नजर लावून लावून ।।।
दिस आता मावळला
संध्या समय झाला ,
अजून माझा भाऊराया,
का नाही आला ।।।
काळजी करते बहिण
पाल मनी चुकचुकली,
माझ्या भाऊरायाची
का तब्येत असेल बिघडली।।।
त्याला उठवत नसेल म्हणून
ओवाळणीसाठी आला नसेल,
जीव झाला जरी कासाविस
मनी हुरहुर करत असेल।।।
माहेराहून भाऊराया निघाला
बहिणीच्या गावास,
तेवढ्यात दारात आली पत्नी
म्हणते आपल्या पतीस।।।
तुम्ही जाता दरसाल
आपला खर्च होतो फार,
सोसवेना आपल्याला आता
तिकिटाचा पडतो भार।।।
तुम्ही असं करा
मनीऑर्डर धाडा ,
वाटलं तुम्हाला तर
खुशाल कार्ड पण धाडा।।।
अड़कित्यात सुपारी जणू
होऊन गेला भाऊराया ,
दम पडेना सासरी तिला
निघाली माहेरी जावया।।।
पार गोंधळून वाट पाहून
रात्री बहिण निघाली सासरातून,
माहेरच्या दारात लेकीला पाहून
माय गेली पूरी भांबावून ।।।
न कळवता कशी लेक आली माहेरा
सासरी काही लेकीला त्रास का झाला,
आतून लेक उतरून बोलले आईला
काळजी वाटली जीव उदास झाला।।।
भाऊ कसा असेल माझा
तब्येत तर नसेल ना बिघड़ली,
गुन्हा लेखाचा पोटात ठेऊन माय उत्तरली,
तुझ्या भावाची नाही माझी तब्येत बिघडली ।।।
