हिवाळ्याचा ऋतू
हिवाळ्याचा ऋतू
हिवाळ्याचा ऋतू नेहमीच
आत्माला स्पर्श करतो
जीवन एक सुंदर
हवाहवासा हर्ष करतो || 0 ||
खाईत आठवणींच्या
स्वतःहून हा उतरतो
कधी कधी मलाही
घेऊन हा घसरतो
सुखदुःखांच्या आठवणींचा
सुंदर परामर्श करतो
जीवन एक सुंदर
हवाहवासा हर्ष करतो || 1 ||
मनाला एक नवं
ताजेपण देतो हा
कलेला एक नवं
साजेपण देतो हा
मन उल्हासित करून
कलेचा उत्कर्ष करतो
जीवन एक सुंदर
हवाहवासा हर्ष करतो || 2 ||
काहीतरी नवीन
घडवून जातो माझ्याकडून
काहीतरी जुनं
अडवून जातो माझ्याकडून
सर्व ऋतूंच्या चक्रात
अप्रतिम आदर्श ठरतो
जीवन एक सुंदर
हवाहवासा हर्ष करतो || 3 ||
काही आठवणींना
तिथेच रोकुन धरतो
काही आठवणींच्या
पुढे हा हरतो
कधी कधी आठवणींचा
प्रखर संघर्ष ठरतो
जीवन एक सुंदर
हवाहवासा हर्ष करतो || 4 ||
