हिप् हिप् हुर्रे ऽऽ
हिप् हिप् हुर्रे ऽऽ
डोंगरदरी कडेकपारी चढलो आम्ही गड
ग्रुप जमवला तरुणांचा ज्यांना ट्रेकिंगची आवड
मुले पंधरा, मुली चार अन् एकच वृद्ध काका
म्हणती नेहमीच निसर्ग मजला बोलवी देऊन हाका
चला म्हणाले सारे, "काढूया पावसाळी सहल,
निसर्गाच्या सान्निध्यात साहस करण्याचा आमचा कल "
बेत आखला चढून जायचा एक कठीण डोंगरगड
रस्ता काढू शोधून ज्यावर वाट चढण्यास अवघड
साथ देती एकामेकां, उपयोगी ये अनुभव काकांचा
घेती सल्ला क्वचित मधूनच भेटलेल्या ग्रामस्थांचा
सरसावले सारे हिरिरीने , केला डोंगरमाथा सर
हर्षित झाले मनोमनी, पाहुनी निसर्गरम्य परिसर
गड जिंकला, सा-यांच्या येई उधाण आनंदाला
अचानक घेई रौद्ररूप निसर्ग, झाली सुरुवात वादळाला
वारा वाहतो प्रचंड वेगाने, पाऊस उन्मादून कोसळला
बिजली करते नर्तन, सारा आसमंत काळवंडला
काळोखाच्या विळख्यातून कोणाला दिसत नव्हते साथी
शब्द फुटेना तोंडातून कोणाच्या, दडपून गेली छाती
घरी परतण्या रस्ता नाही, मार्ग झाला निसरडा सारा
झाडे वेली उन्मळून पडल्या, उडवी त्यांस बेभान वाहता वारा
एवढ्यात ऐकली किंचाळी, एका मैत्रिणीची आमच्या
पाय घसरून कोसळली, भीतीने थरकाप मनी सा-यांच्या
आवाज देती मित्र तिजला, परी न ये हाकेला उत्तर
दणाणले धाबे सा-यांचे , सुचेना काय करावे सत्वर
एकमेकांना शोधण्यास्तव देती समूह प्रमुख हाका
धैर्य देऊन सांगती, " शांत व्हा, जरी प्रसंग हा बाका"
तोच आठवले कोणा एकाला, काकाही दिसत नाहीत कुठे
काय जाहले असेल तयांचे, भीतीने काळजात कळ उठे
आणीबाणीची वेळ अशी ही, पावले उचलाया हवी तत्पर
खोळंबून राहणे अशक्य हे, कसे राहावे इथेच रात्रभर
तेवढ्यात ये आवाज कानी काही माणसांचा
शोधत आम्हाला सुटका करण्या आलेल्या पथकाचा
हायसे वाटले मनाला त्यांसोबत काकांना पाहून
घाबरलेल्या जीवांस आमच्या मिळाले नव-संजीवन
मागाहून समजले, काका अंधारातही पहाड उतरून गेले
डोंगराखाली वस्तीवर जाऊन ग्रामस्थांना बोलावले
बुधल्या, मशाली घेऊन हाती, गिरिकंदर शोधला
दरडीमध्ये कोसळल्या मैत्रिणीस शोधून जीव वाचवला
साहस काकांचे पाहून अचंबित झालो आम्ही सारे
"हिप् हिप् हुर्रे ऽऽ ", सर्वांनी लावले जयघोष नारे
