गझल कसे म्हणावे
गझल कसे म्हणावे
पाठीत घाव केला लढला कसे म्हणावे
ओकून आग गेला चुकला कसे म्हणावे
सख्खा गरीब भाऊ पैशात मोजतो तो
माणूस थोर होता असला कसे म्हणावे
मेली बहीण तेव्हा भेटावयास आला
प्रेतास देत खांदा रडला कसे म्हणावे
रानात बाप मेला कामात राबताना
श्रीमंत पोर मोठा बनला कसे म्हणावे
घेऊन लाच मोठी कामात राबला तो
शाळेत खूप मोठा शिकला कसे म्हणावे
तोडून सर्व नाते पैशात नाचतो तो
आयुष्य भावनांचे जगला कसे म्हणावे
रक्तास काढतो जो घायाळ माणसांच्या
काटा मनास त्याच्या रुतला कसे म्हणावे
आनंद मानतो जो फाडून काळजांना
गालात मंद थोडा हसला कसे म्हणावे