गीत माझे
गीत माझे
नाही मी प्रतिभावंत ,
नाही मला संगीताची जाण ,
इतकेच मात्र ठाउक मला
चेह-यावर खुलते हसू मुलांच्या , हीच माझ्या गीताची शान...
भैरवी , मल्हार , केदार , शिवरंजनी
राग हे तर , फक्त नावापुरता
मी मात्र जाणते , तो एकच माणुसकीचा राग ,
फुलवितो जो , रसिकांच्या मनातील बाग ...
ना कुठलेही शास्त्रशुद्ध प्रशिक्षण ,
ना पेटी तबल्याची साथ ,
इतकेच पण ठेवते भान मनात ,
माझ्या गीतातून व्हावी , शुभ्र चांदण्यांची बरसात ...
नाही कळत त्या क्लिष्ट संज्ञा
सप्तक , षडज् , पंचम , निषाद
इतकेच मात्र कळते मला ,
गीत माझे भिनूदे , प्रत्येकाच्या हॄदयात ...
नाही वाजविता येत टाळ
नाही छेडता येत , सतार
इतकेच मात्र ठाउक मला ,
आर्त खोलवर रूजावे , माझ्या गीतातील भाव अलवार ...
नाही कळत मला आलाप ,
नाही कळत सूरताल ,
इतकेच मात्र ठाउक मला ,
माझ्या गीतातून पेटू दे , राष्ट्रभक्तीची शाश्वत मशाल ...
