घर बदलताना
घर बदलताना
अडगळीत फेकलेल्या वस्तू
सजीव होऊन
बोलू लागतात
काही आठवणी सांगत
गुंता निर्माण करतात
मनाच्या कोपऱ्यातील
एखाद्या अपूर्ण
कवितेचा कागद
भेट आलेले पुस्तक
अथवा किराणा
साहित्याची यादी
रस्त्यातच उतरून
घेतलेला पत्ता
आधार, मतदान कार्ड
नि संपलेले पासबुक
रंग उतरलेले
जपलेले जुने फोटो
काळजावर रेघोट्या
मारत बसतात
नि मग वेळ जातो
आठवणींचे गाठोडे बांधण्यात
या घरातून त्या घरात
त्यांची सुरूच असते तडफड
फेकता येत नाही अन्
जपता येत नाही
आपली नुस्ती फडफड
घर बदलताना...
