घाव
घाव
अकाल माझ्या दारी पडला का
तू दिलेला घाव उरी दडला का
तू असो वा नसो
मी मात्र असतोच
कालच्या कवितेच्या
ओळीत हसतोच
सोबती माझा आज नडला का
तू दिलेला घाव उरी दडला का
सुरुवात तुझ्यापाशी
रोज घुटमळते येऊन
सुचावं काय नाव ते
कविता जरी पूर्ण होऊन
कवितेत रोष तुझा भिडला का
तू दिलेला घाव उरी दडला का
तुझा अभिप्रायही
धुरकट होऊन गेला
काळजाला निर्वाणीचा
इशारा देऊन गेला
प्रेमात असला प्रकार घडला का
तू दिलेला घाव उरी दडला का
वाद तुझा माझा
कधी मिटला नाही
शाप असा भेटला
कधी फिटला नाही
मयत माझी पाहून गाव रडला का
तू दिलेला घाव उरी दडला का
