STORYMIRROR

Dhanesh Jukar

Fantasy Others

4  

Dhanesh Jukar

Fantasy Others

एक झगडा एक खटला

एक झगडा एक खटला

1 min
233

उडाला एक झगडा, भरला एक खटला

न्यायालयात नेले, मनाने मनाशी


कसा मी वागतो, कसा मी बोलतो

सवाल जबाब, मनाचे मनाशी


काय मी लपवू , कसे काय छपवू

खुला हा व्यवहार, मनाचा मनाशी


असा मी नाही, तसा मी नाही

मांडला बचाव, मनाने मनाशी


गुन्हे हे अनेक, अविचार अविवेक

ठरविला अपराधी, मनाने मनाशी


तू हे केले, नव्हे नकळत घडले

वकील लढले, मनाचे मनाशी


शिक्षा काय द्यावी, कशी ती भोगावी

पडला मोठा पेच, मनाचा मनाशी


पुन्हा करू नको हेच, लागली ना ठेच

समज नुसती दिली, मनाने मनाशी


मन माझे मोठे, आरोप ठरविले खोटे

केले मज मोकळे, मनाने मनाशी


खटला संपला, आरोपी सुटला

न्यायदान झाले, मनाचे मनाशी


आरोपी मीच, वकील मीच

न्यायाधीश मीच, मनाचा मनाशी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy