देखणे चित्र
देखणे चित्र
सौख्यात झोपडी माझी एकटी नदीच्या काठी
दुःखास घालते पोटी आनंद पेरण्यासाठी
अंधार मिटविण्यासाठी मिणमिणती पणती लढते
देऊन झुंज एकाकी ताऱ्याहुन वरचढ ठरते
घेऊन गंध कष्टाचा बेभान वाहतो वारा
उत्साह उद्याचा देते ती खळखळणारी धारा
उत्तुंग उभे ते माड वाढवी कुटीची शान
लाउनी नभाला माथा ठेवती धरेचे भान
परसात वाढली झाडे आधार जणू जगण्याचा
दारात फुलांच्या वेली संदेश देत फुलण्याचा
कातळी वाट वळणाची गवतांशी सलगी करते
खडकाळ टेकड्या चढुनी सरितेच्या काठी सरते
भवसागर तरण्यासाठी ठेवली किनारी नाव
वासना संपली तेथे ना उरली कुठली हाव
आश्वस्त चित्र शांतीचे ना गलबलाट लोकांचा
पावित्र्य घेउनी उमटे ओंकार नाद श्वासाचा
