छत्रपती शिव पोवाडा
छत्रपती शिव पोवाडा
महाराष्ट्राची संस्कार गाथा, राष्ट्रमाता स्फूर्तिस्थान
मानवंदना प्रथम शूर शहाजीराजे जिजाऊं स्मरण
झुकवून सदा मान, त्रिवार करिते वंदन
छत्रपती शिवाजी महाराष्ट्राचा अभिमान
बोला जीजी जी जी जी......
सोनियाचा उजाडला दिन
शिवनेरी गडावर, आले उधाण आनंदास
सूर्यासम तेजस्वी राजपुत्र
जिजाऊंच्या पोटी आले जन्मास, वंदन माझ्या राजास
बोला जीजी जी जी जी......
बाळ शिवाजी लागले वाढीस
युध्दनितीचे दिले धडे, पाजिले संस्कार बाळकडू
धन्य जिजाऊ माऊलीच्या प्रेरणेने
छत्रपती शिवराय लागले घडू, मावळे ही लागले वाढू
बोला जीजी जी जी जी......
स्वराज्य स्थापनेची घेतली शपथ
त्रस्त केले मोघलास,
घडविला स्वराज्याचा नवा इतिहास
पराक्रमी शूर थोर कुलावंतस
बोला जीजी जी जी जी......
सह्याद्रीच्या कडेपारी, कडाडली तलवार
शूरमावळे संगतीला शिलेदार
साक्ष देतो दख्खनचा पठार, राजबिंडा मराठा बाणेदार
घोड्यावर होई स्वार
बोला जीजी जी जी जी......
तोरणा किल्ल्यावर बांधिले पहिले तोरण
गड जिंकण्या केली सुरूवात
मराठ्यांचे राज्य केले स्थापन
गुलामगिरीच्या अंधारातून शिवज्योत केली प्रस्थापित
ध्वज भगवा फडकला महाराष्ट्राच्या कळसात
बोला जीजी जी जी जी......
औरंगजेबास केले घायाळ आणिले जेरीस
शाहिस्तेखानाची छाटून बोटं
अफजलखानाचं वाघनखे खुपसून फाडीलं पोट
मराठ्यांची केली मोकळी वाट उगवली सोनेरी पहाट...
बोला जीजी जी जी जी......
गनिमी काव्याने शत्रूला केले हैराण
औरंगजेबाच्या हातावर ठेवल्या तुरी
आग्राहून आले सुखरूप घरी
आई जिजाऊचा आशीर्वाद पदरी
आई भवानी छाया धरी
बोला जीजी जी जी जी......
सवंगडी तानाजी, बाजी
येसाजी, व्यंकोजी, धनाजी
जिवाजी, संताजी लढले
लावून प्राणांची बाजी
बोला जीजी जी जी जी......
सूर्य, चंद्र, तारे पृथ्वीतलावर
छत्रपती शिवशंभो नाव गर्जत राहणार
युगानयुगे शतकानुशतके आमच्या
छत्रपतींचे विचार, हेच आमचे संस्कार
परंपरा अखंड चालणार
बोला जीजी जी जी जी......
