मांगल्य गुढी
मांगल्य गुढी
चैत्र पालवी भरास
नव तरुणी दिसते
सृष्टी शोभते वरास ||१||
अशा उत्साही भरात
गुढी पाडव्याचा सण
घरीदारी सर्वांच्याच
येई आनंदा उधाण ||२||
दुष्ट विचार दहन
सारे जळले होळीत
एकजूट समतेची
कडूलिंब डहाळीत ||३||
भारतीय संस्कृतीचे
नवे पर्व आगमन
गुढी उंच उभी दारी
सुख समृद्धी तोरण ||४||
नव वर्षाचे स्वागत
मनी संयमी विचार
शुभ आरंभ कार्याचा
करु मांगल्य स्विकार ||५||
