चैत्र पालवी फुटली
चैत्र पालवी फुटली
वसंत येता वसुंधरेवर
नवी चैत्र पालवी फुटती
गुलमोहराच्या लाल सुमनी
भ्रमर बसुनी मध घेती ||
सौंदर्याने बहरूनी सृष्टी
साखर झोपेतून उठली
फाल्गुनाच्या रंगांनी न्हाऊन
चैत्र चैतन्य जागून नटली ||
फुलला निसर्ग दाहीदिशा
मोहरली पहा अमराई
हिरव्या हिरव्या पानातूनी
मोहक सौंदर्याची दुलई ||
सृष्टीच्या तनुवरती फिरवली
जादूची कांडी ऋतुराजांनी
तार सप्तकामधली तार छेडीत
कोकिळेची कुहू -कुहू कानी ||
नववर्षाची चाहूल लागी
गृहिणींची लगबग न्यारी
आमरस,पुरणपोळी नैवेद्या
उंच गुढी उभारी भारी ||