भुपाळी 🌺
भुपाळी 🌺
रवी कोवळा पूर्व दिशेला बघ तो जागा झाला
आळवण्या आला तुजला उठ उठ रे नंदनंदना .... || धृ ||
झाडांचा बघ झोका केला राघु त्यावर झुलू लागला
भोळी मैना तुला बोलवी अंगणात खेळण्याला
किलबिल संगीत पक्षी गाती तुला साद देण्याला
उठ उठ रे नंदनंदना.. || 1 ||
गाय हंबरे माय पिलांची ऐक राजसा धार दुधाची
मुख तव पहाण्यासाठी वासरेही तगमग करती
उभा सवंगडी धाव नदीची जा लगेच पोहण्याला
उठ उठ रे नंदनंदना.....|| 2 ||
सडा संमार्जन धूप दीप तो निरांजन सजला
घराभोवती गोप गोपिका जमल्या मुखदर्शनाला
उठ मुकुंदा,उठ उठ रे कृष्णा पाहू नको अंत ग्वाला
उठ उठ रे नंदनंदना...|| 3 ||
उठ राजसा नंदकिशोरा राग मला आला
दही, दुध, लोणी कशास ठेवू तुला भरवण्याला
तुच एकटा नाही लाडका देईन अवघ्या गोकुळाला
उठ उठ रे नंदनंदना...|| 4 ||