भाकरी
भाकरी
रखरखत्या उन्हात
ग्रीष्माच्या तडाख्यात
दगडाच्या चुलीवर
काडयांच्या आगीवर
काळ्याकुट्ट तव्यावर
तिची भाकरी शिजत होती
सुरकतल्या हातांनी
शिणलेल्या चेहर्याचा
घाम निथळत
भाकरीच पीठ ती रांधत होती.
कोरडयावर ओल
काय कराव
आजची चिंता
संपत नाही
उद्याच काय
पोटाला चिमटा देत होती
एक हाताशी एक पोटाशी
हुंदका गळ्याशी
सुकलेल्या आसवांची
गाठ पापण्यांशी
अस जगण ती जगत होती
अंगावरच लक्तर सांधत
दारिद्र्याचे टाके शिवत
पोटाची खळगी भरत होती
तिची भाकरी नेहमीप्रमाणे
तापलेल्या तव्यावर करपत होती
भाकरीच्या पोपडयाकडे पहात
सोनेरी स्वप्न ती रंगवत होती.
