बैल पोळा
बैल पोळा
बळीराजाच्या सुखात
झटूनिया दिनराती
मूक जनावरालाही देवा
कशी कळती रे नाती?
जगाच्या पोशिंद्याचा
भार ज्याच्या वरती
साथ मिळाली भक्कम
सर्जा-राजाची मेहनती
बैल पोळ्याचा हा सण
कृतज्ञता बैलराजाप्रती
कृषिप्रधान, कृषिवल देश
धन्य जाहला या जगती
बांधूनी बाशिंग शिंगांना
सजवूनी पोळ्यात मिरविती
अंगावरी मखमली झूल
नैवेद्य पुरणपोळीचा अर्पिती
वर्षानुवर्षे काबाडकष्ट
एक दिवस विसावती
धन्यासंग खिल्लारी जोडी
नटूनथटून पोळ्यात मिरविती
सर्जा-राजा, बळीराजा
कशी अनामिक नाती
जगाच्या पोशिंद्याने गाठले
मायेच्या मैत्रीचे शिखर त्रिजगती
