बाप
बाप
हात धरुन शिकवले चालावयास
हजार वेळा मी धडपडले रस्त्यात
आज मात्र खंबीर उभी मी
बाबा तुमचाच वाटा आहे सगळ्यात ||
कडेवर घेऊन फिरवले मला
कधीतरी हात दुखला असेल तुमचा
तरीही कधी नाही टाळले
विचार केला फक्त माझ्या मनाचा ||
कामासाठी बाहेर गावी जायचात
रोज तुमची मी वाट बघायची
परतल्यावर यायची मी धावत खरी
आनंद मात्र मनातच ठेवायची ||
शिक्षण संपले लग्न ठरले
ओलांडला उंबरा तुमच्या घराचा
खूप त्रास दिला बाबा तुम्हाला
तरीही नाही चढला पारा तुमच्या रागाचा ||
सासरी निघताना होते ओठावर हसू
डोळ्यात होते दु:ख पाश तुटल्याचे
बाबा तुमच्या सहनशक्तीला प्रणाम
नंतर कळाले अश्रूंचा बांध फुटल्याचे ||
माझ्या लग्नाला झाली वर्षे अठरा
हट्ट आईस्क्रीम खिशात ठेवण्याचा
काहीच नाही विसरले बाबा
आहे पुरावा सगळे हट्ट पुरवल्याचा ||
नोकरी संपली तरीही करता कष्ट
तुमच्या स्वाभिमानाला माझा सलाम
नाही पसरले हात कधीही
याचाच मला आहे अभिमान ||
प्रेम तुमच्यावर अबोल माझे
अथांग आहे सागरापरी
आज मांडते शब्दांमधूनी
साथ द्या मला घेण्या भरारी ||
एक इच्छा आहे अधुरी
एकदा तरी जवळ घ्यावे
पाठीवरुन हात फिरवुनी
आहे पाठीशी एवढेच म्हणावे ||
