STORYMIRROR

Nishikant Deshpande

Inspirational

3  

Nishikant Deshpande

Inspirational

अनुत्तरीत राहिल ( तरही)

अनुत्तरीत राहिल ( तरही)

1 min
294


पसा भरून मोद अन् अमाप दु:ख का दिले?

कितीक प्रश्न का असे अनुत्तरीत राहिले?


अता सरावलोय दु:ख भोगण्यास एवढा

सुखाशिवाय हासण्यास मी मलाच शिकविले


प्रदर्शनात वेदना कधी न मांडल्या रड्या

सुरात दु:ख, मी तरी खुशीत गीत गाइले


नसेच देव या जगी हजार तर्क मी दिले

यदा कदा असेल तर? लपून फूल वाहिले


उशीर जाहला कळावया सुमार माणसे

महान वाटले तयास व्यर्थ काल पुजिले


पिलास दूर देश का चरावयास लागती?

न माय आठवे जिने तयास घास भरविले


उशास वेदना तरी सुरेख झोप लागली

अमीर भोगतात त्या खुज्या सुखास हिणविले


प्रभूच करविता जगी पुराण शास्त्र सांगती

कशास रावणाकडून पाप व्यर्थ करविले?


नकाब फाडताच, चेहरे किती भयाण ते!

प्रतिष्ठितात खूप हिंस्त्र श्वापदांस पाहिले


पहिल्या शेरातील दुसरी ओळ आदरणीय डॉ. राम पंडीत यांची आहे.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational