अण्णा, तुमची येता आठवण!
अण्णा, तुमची येता आठवण!
अण्णा तुमची आम्ही लेकुरे
जाहलो जरी आमच्यात व्यस्त!
आजही तुमची आठवण येता
स्मरतो आंम्हा भूतकाळ समस्त!!१
आठवण येता आजही तुमची
मातोश्रींच्या डोळ्यांत पाणी दाटते!
तिला असं एकाकी पाहून
ह्रदयी अनामिक भीती वाटते!!२
तुम्ही आम्हाला वाढवतांना
कितीतरी हो सोसलं!
एकाएकी असं तुमचं जाणं
सा-यांनाच फार बोचलं!!३
आमच्या सर्वांच्या सुखदु:खात
होतात तुम्हीच सहभागी!
तुमची खरी ओळख उशीरा पटली
आम्हीच ठरलो अभागी!!४
प्रत्त्येक शब्द आमच्यासाठी
लाख मोलाचाच होता!
आई इतकेच तुम्हीही खरे
आमच्यासाठी अनमोल होता!!५
आंम्ही काय गमावले आहे
आंम्हालाच नाही हो कळत!
तुंम्ही गेलात म्हणायला ही
जीभ सुद्धा नाही वळत!!६
जिवंतपणी चांगल्या माणसांची
जगाला खरी किंमत कळत नाही!
कितीही आकांत केला तरीही
गेलेलं माणूस पुन्हा मिळत नाही!!७
तुम्ही असे एकाएकी जाल
याची कल्पना केलेली नव्हती!
मनाविरुध्द घडवीत असते
म्हणूनच ती का ठरते नियती?!!८
आज तुमचा वाढदिवस तरीही डोळ्यांत आमच्या येतंय पाणी!
अव्यक्त मनाने प्रणाम करतांना तुंम्हाला अबोल होतेय वाणी!!९
