अनाठायी भीती
अनाठायी भीती
एक छोटेसे पण टुमदार गाव
राईनपाडा त्याचे नाव
वार होता रविवार
सुरू होता आठवडे बाजार
तिकडे बस स्टँडवर
अकरावी गाडी येऊन धडकली
बाजारात अनामिक भीती पसरली
बसमधून 'ते' ही सहा जण उतरले
विचित्र वेशभूषाधारी बाजारात अवतरले
बाजारातील लोकांना प्रश्न पडला गहन
कोण असावे 'हे' सहा जण
'त्या' संशयित सहा जणांनी
बाजाराचा एक एक कोपरा काबीज केला
एव्हाना, बाजारात भीतीची साथ पसरली होती
कुणीतरी हवेत मारली गोळी
म्हणे, ही आहे मुले चोरणारी टोळी
मग काय? एकच धावपळ बाजारात
जो तो आपल्या मुलांच्या शोधात
शांततेत चाललेला बाजार विस्कटला
अन् बाजारातील जमाव टोळीवर संतापला
जमावाच्या अंगात सैतान शिरला
सहाही जणांना मार मार मारला
एक अर्धमेला जिवाच्या आकांताने पळत सुटला
पाच जण मात्र रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडले
'ते' चोर नव्हे तर भिक्षेकरी होते.
इकडे जमाव भानावर आला होता
सारा गाव सुना झाला होता
आताची भीती मात्र सर्वात 'भयाण' होती
