पाठीवरचे बिऱ्हाड
पाठीवरचे बिऱ्हाड
1 min
23.3K
पाठी लादले बिऱ्हाड
सदा पायाला भिंगरी
पोटासाठी गावोगावी
चाले कसरत सारी..१
डोई आकाशाचे छत
भूई आमचा निवारा
दोन घासाची लढाई
कधी पितो आम्ही वारा..२
नाही घर नाही गाव
दोन भांड्याचा संसार
माणसांना वर्ज्य आम्ही
मुके सोबती आधार..३
दुःख सोसले भोगले
झाले देहाचे चिपाडे
मांस कष्टाने झडले
फक्त उरले सांगाडे..४
नाही शाळा नाही शिक्षा
नाही विकासाचा वसा
मुले अडाणी आमची
पुढे चालवी वारसा..५
युगे युगे पुढे चाले
दुष्टचक्र गरिबीचे
करा दहन त्वरेने
पक्षपाती व्यवस्थेचे..६
धन्य धन्य रे निसर्गा
तुच.. असे मायबाप
लाथाडले माणसाने
बरा वाटे विंचू साप..७
