हरवलेली माणुसकी
हरवलेली माणुसकी
जगात राम कसा नाही बाकी?
माणसा कसा विसरला तू माणूसकी?
आपल्या प्रजातीचे कलेवर पाहून
पशुंचाही दाटून येतो गहिवर
कावळे करतात काव काव
कुत्रे रडतात त्यांच्या भाषेत
गुरे ढोरे हंबरतात
माणसा तू मात्र...
आपल्या जातीचे कलेवर पाहूनही
कसे मन हेलावून जात नाही तुझे?
मदत, सहानुभूती, सांत्वना
कुठे लुप्त झाल्या मानवी भावना?
त्या पेक्षा तू सेल्फी घेऊन
मृत्यूचाही मांडतो बाजार
सोशल मीडियावर...
माणसा कसा विसरला तू माणुसकी?
संयुक्त कुटुंब अन् नात्यातील गोडवा
प्रेम, आपुलकी, जिव्हाळा
कुठे हरवला ह्रदयातील ओलावा?
स्वार्थ, द्वेष, मत्सर, अहंकार
या विकारात माणसा आकंठ बुडाला
विसरु नकोस..
काडीची माडी होते
अन् माडीची ही काडी होते
पैशाच्या लोभापायी...
माणसा कसा विसरला तू माणुसकी?
तू माणसासारखा दिसतो
म्हणूनच तुला माणूस म्हणावे लागते
पशूसारखे बनत चालले तुझे वागणे
तुटून पडतो गिधाडासारखा..
लांडग्यांच्या टोळी सारखा सावज हेरतो
टोळीनेच कुस्करतो रे कळ्यांना..
श्वापदापेक्षा ही तुझी दहशत भयंकर
माणसा कसा विसरला तू माणुसकी?
तीन पिढ्यांच्या पलिकडचा
माहित नाही तुला इतिहास
तरी तुला हवा असतो वंशाचा दिवा
उन् उदरातच गाडतो या सृष्टीचा ठेवा
माणसा कसा विसरला तू माणुसकी?
कुठे गेली सहिष्णुता?
कुठे गेला बंधुभाव?
दगडाच्या देवासाठी
अन् काल्पनिक धर्मासाठी
अजून किती पाडशील मुडदे?
माणसा कसा विसरला तू माणुसकी?
उंच उंच इमारती वाढल्या
पण तितकीच ममता आटली
कुत्रे पाळणाऱ्या घरात
आई मात्र अडचण वाटू लागली
क्षणभंगुर धनासाठी
वृध्द मातापित्यांची होते अवहेलना
जिथे गाय कसाईला दिली जात नाही
तिथे आईला वृध्दाश्रमी सोडले जाते
वाह रे! माणसा तुझी मर्दानगी
माणसा कसा विसरला तू माणुसकी?
