अबोल प्रीत
अबोल प्रीत
मूक तुझ्या ओठात
अस्फुट कलिकांचे भास
मुकुलदर्पण बाजूस सारत
विलगीत पाकळीत दरवळे सुवास।।१।।
मूक तुझ्या नजरेत
खोल डोहाची गहराई
पापणीच्या निमिष उन्मेषात
प्रीत तरंगांची नवलाई।।२।।
मूक तुझ्या हास्यात
कारंजांचे नाचती तुुुषार
बंदिस्त तरी नेमस्त
काळजावर होती शेकडो वार।।३।।
मूक तुझ्या मिठीत
भास नवनवे मोरपिशी
ह्रदयाच्या प्रत्येक ठोक्यात
संगीतसाजाच्या बंदीशी ।।४।।
मूक तुझ्या स्पर्शात
शब्दातीत भावनांची गाज
मऊमुलायम तनुलतेत
स्मृती गंधांंचे छुपे राज।।५।।
तव प्रीत ही अबोल
शब्दावीण संवाद तरल
स्वार्थी बिभत्स दुुुनियेला
कश्या कळतील या भावना अनमोल?।।६।।

