आठवणीतील दिवाळी
आठवणीतील दिवाळी
लहानपणी आमच्या
दिवाळी साजरी व्हायची
कडकडीत थंडीतही
आई मात्र उठवायची
हमखास मोतीसाबन
ठरलेलाच असायचा
घरच्या उटण्याचा
सुगंध दरवळायचा
ताटभर फराळ
आई पुढ्यात ठेवायची
माझ गोड बाळ म्हणून
हळूच पापी घ्यायची
नवीन कपडे घालून
लयी भारी वाटायच
शाळेचीही कटकट नाही
दिवसभर खेळायच
भाऊबीज येताच
धमाल असायची
बैलगाडीत बसून
मामाकडे जायची
झगमगाट नव्हता तरी
खूप माया असायची
आजीच्या डोळ्यात ती
ओतप्रोत भासायची
