येरझार
येरझार
हिरवाईच्या पंखावरते
रंगीत नक्षी ही भिरभिरते
रंग रंगिल्या नभांगणी ते
नित गुंजन कोण हे करते।।१।।
सृजनाच्या या बहरावरते
अंकुर नाजुक ते प्रसवते
धरित्रीच्या मखमली उदरावरते
नाजुक गोंदण ते हुंकारते।।२।।
इवलेसे सोनसळी पाते
दावूनि वाकुल्या गभस्तीते
हलकेच वारियावरी झुलते
आपल्या मस्तीतही डुलते।।३।।
भाळुनि सोनसळीच्या तनुल रूपाते
कृष्ण मिलींदही वेडावतो
छंद साठवण्या मधुकणाते
एकतानतेनेही समरसते।।४।।
उत्कट सुख क्षणी समिपते
गात्रोगात्री धुंदी चढते
मनोमनीचे बहरत नाते
बीज उन्मादाचेही फुलते।।५।।
जन्म फुकाचा वाया जातो
लक्षलक्ष योनीतून फिरतो
हरिनामाचे पुण्य जोडतो
तो या भवसागरी तरतो।।६।।
जन्म-मृत्यूची येरझार तो
कोण कसा तो कसा चुकवितो
हरिचरणांशी नाळ सांधतो
पैलतीरा मोक्ष गवसतो।।७।।