येशील का परतून.....
येशील का परतून.....
ग्रिष्मतप्त आदित्य मेखला
गात्रोगात्री लिप्त उष्म शलाका
कासावीस अवनी क्षमाशील निश्चला
घाली आसोसून साद कृष्णमेघ सख्याला|१|
तृषार्त धरित्री ही उसवता
गात्रे पिडीली व्रण भेगाळता
लतावेलींठायी असे आतुरता
कधी बरसुनि देशी तृप्तता?|२|
संपला वसंताचा बहर
तप्त ग्रीष्माने मांडला कहर
अग्निदग्ध किरणांचे विखार
सख्या रे, सांग कधी बरसशील अनावर?|३|
तव भेटीस आतुर रजःकण
उधाणले हे बेधुंद यौवन
निपचित गात्रे अन् शिथिल ही मन
सख
्या रे, कधी बहरणार हे जीवन?|४|
ठायीठायी भास हे मृगजळाचे
कोंडती श्र्वास हे अंतरीचे
विलगती शुष्क ओष्ठ तव प्रियेचे
सख्या रे, भास वेडे सरीवर सरींचे|५|
कधी मुसळधार तू बरसशील?
मृद्गंधाचे अत्तर कधी शिंपशील?
कवेत मजला कधी रे घेशील?
सख्या रे दिवाणे स्वप्न कधी साकारशील?
परतुनि केव्हा तू येशील?|६|
मुग्ध ओष्ठी आस निरंतर
पिडीले विषाणूंनी हे चराचर
साहवेना हा छल करी बेजार
करशील का त्यास हद्दपार
सख्या रे बरसशिल का अनिवार?...|७|