स्वप्नरंगी रंगले.....
स्वप्नरंगी रंगले.....


अलवार अलगुजाचे नादे
तो स्वप्नझुल्यावर तरंगे
एक स्वप्न विव्हल वेडे
मम नयनी ते विराजे.....
क्षितीजापाशी अवचितसे
निळसर गोंदण सजे
सोनसळी पाऊलपंखी
तो श्यामसखा विहरे|१|
मी ध्यानमग्न एकटी
गर्दरानी यमुनातटी
नेत्र आसुसले भेटी
अवचित समोर पाऊले उमटती|२|
भरजरी पितांबर कटी
त्यावर कशिद्याची वेलबुट्टी
अलगद सुवर्ण पाव्याची
अधरोष्ठा पडतसे मिठी|३|
येऊनी मम समीपसा
तो मनमोहन उभा ठाकला
निमिषमात्रे दृष्टादृष्ट होता
नयनी तो मम ह
रवला|४|
तयाच्या नील मृदुल करस्पर्शे
विगलित माझी गात्रे हर्षे
धुंदी नयनी मनही तरसे
गाली लज्जेचा रक्तिमा बरसे|५|
सावळ्या बाधेने मज पिडीले
व्याकूळ मन स्फुंदून रडले
का या कातरवेळी मज छेडीले
स्पर्शसहवासे अवघे तनू शहारले|६|
सावळ्या, तव रंगी मी रंगले
निळाईचा शेला मी पांघरले
मोरपिसाची काचोळी ल्याले
तिन्हीसांजी तुज सर्वस्व अर्पियले|७|
मनमोहना हे जगजेठी
अलगद मिठीत मज कवळशी
मी राधा मीच तव मधुरा प्रीती
तव मिलनी एकात्म्याची प्रचिती|८|