तृप्त मी
तृप्त मी
दाटले भाव वेडे
नेणिवांचे अंतरी
काजव्यांच्या झगमगाटी
जाणीवांचे स्वप्न उरी|१|
भावबंध नात्यांचे
जरी मी गुंफले
पाय माझा मोकळा
मी नाही गुंतले|२|
हृदयी तव तेवते
शांत मी निरांजनापरी
धग तुज न लागो
पेटूनी स्वाहेपरी|३|
कुंठीत श्वास माझे
केतकीच्या रे बनी
चंदनासम का झिजविशी वेड्या
देह तेजस्वी तनमनी|४|
सुवर्ण चंपक देश माझा
गंधाळते दाही दिशी
दरवळूनी श्र्वास
सारे
जाहले मी आता रिती|५|
साठवांच्या आठवांचे
डंख तुज दंशती रे
विसरुन त्या स्मृतींना
पसरवुनी पंख तू घे भरारी|६|
मळभ दाटल्या भावनांना
आसवांनी तू झरू दे
कर आकाश मोकळे मनाचे
उमलुनी पुन्हा फुलू दे|७|
अनुरक्त अनुरागाचे
क्षणिक ते भांबावलेपण
सरले सारेच मागे
उत्फुल्ल प्रितीचे ते क्षण|८|
बहरले जीवनी माझ्या
काही न आता कमी
सहवासे तुझ्याच रे
तृप्त मी तनमनी|९|