STORYMIRROR

balkavi balkavi

Classics Fantasy

0  

balkavi balkavi

Classics Fantasy

आनंदी आनंद गडे

आनंदी आनंद गडे

1 min
1.2K


आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहिकडे || धृ.||


वरती खाली मोद भरे,

वायूसंगे मोद फिरे

नभांत भरला,

दिशांत फिरला,

जगांत उरला,

मोद विहरतो चोहिकडे || १ ||


सूर्यकिरण सोनेरी हे,

कौमुदि ही हसते आहे,

खुलली संध्या प्रेमाने,

आनंदे गाते गाणे,

मेघ रंगले, चित्त दंगले,

गान स्फुरले इकडे, तिकडे, चोहिकडे || २ ||


नीलनभी नक्षत्र कसे,

डोकावुनि हे पाहतसे,

कुणास बघते ? मोदाला;

मोद भेटला का त्याला ?

तयामधे तो, सदैव वसतो,

सुखे विहरतो इकडे, तिकडे, चोहिकडे || ३ ||


वाहति निर्झर मंदगती,

डोलति लतिका वृक्षतती

पक्षी मनोहर कूजित रे,

कोणाला गातात बरे ?

कमल विकसले, भ्रमर गुंगले,

डोलत वदले इकडे, तिकडे, चोहिकडे || ४ |

|

स्वार्थाच्या बाजारात,

किती पामरे रडतात,

त्यांना मोद कसा मिळतो,

सोडुनि स्वार्था तो जातो,

द्वेष संपला, मत्सर गेला,

आता उरला इकडे, तिकडे, चोहिकडे || ५ ||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics