आमचाही प्रेम दिवस
आमचाही प्रेम दिवस
75 वर्षाचे आजोबा म्हणाले
सत्तर वर्षाच्या आजीला
अग आपण देखील आज
करू या साजरा व्हॅलेंटाईन डेला
असे म्हणून आजीच्या
सुपारी एवढ्या अंबाड्यात
माळला त्यांनी गजरा
आणि नातवंडांच्या खिळल्या
दोघं वरती नजरा
टेडी चॉकलेट देतात म्हणे
आणि देतात गुलाब
असे ऐकताच आजींच्या
गालावर फुलले लाखो गुलाब
इश्श्य म्हणत आजी
झकास लाजल्या
आणि बंद पापण्या आड
जुन्या आठवणी सजल्या
आजी म्हणाल्या अहो प्रेमासाठी
असा एक दिवस का पुरतो
एवढी वर्षे झाली लग्नाला
तरी आपण एकमेकांच्या
पाठी फिरतो
जन्मोजन्मीच्या गाठी
भेटीने देखील
एकमेकांसाठी झुरतो
सोडून सगळी बंधने फक्त
एकमेकांसाठी उरतो