जाणता राजा..
जाणता राजा..
निश्चयाचा महामेरु । बहुत जनांसी आधारु ।
अखंड स्थितीचा निर्धारु । श्रीमंत योगी १॥
परोपकाराचिये राशी । उदंड घडती जयासी ।
तयाचे गुणमहत्त्वासी । तुळणा कैची २॥
यशवंत कीर्तिवंत । सामर्थ्यवंत वरदवंत ।
नीतिवंत पुण्यवंत । जाणता राजा ३॥
आचारशीळ विचारशीळ । दानशीळ धर्मशीळ ।
सर्वज्ञपणे सुशीळ । सकळां ठायी ४॥
नरपति हयपति गजपति । गडपति भूपति जळपति ।
पुरंदर आणि शक्ती । पृष्ठभागीं ५॥
तीर्थेक्षेत्रे मोडिली । ब्राह्मणस्थाने भ्रष्ट जाली ।
सकळ पृथ्वी आंदोळली । धर्म गेला ६॥
आणिकही धर्मकृत्ये चालती । आश्रित होऊन कित्येक राहती ।
धन्य धन्य तुमची कीर्ती । विश्वीं विस्तारिली ७॥
कित्येक दुष्ट संहारिले । कित्येकांसी धाक सुटले ।
कित्येकांस आश्रय जाले । शिवकल्याण राजा ८॥
सर्वज्ञ मंडळी धर्ममूर्ती । सांगणे काय तुम्हाप्रती ।
धर्मसंस्थापनेची कीर्ती । सांभाळिली पाहिजे ९॥
उदंड राजकारण तटले । तेणे चित्त विभागले ।
प्रसंग नसता लिहिले । क्षमा केली पाहिजे १०॥