अरविंद कुलकर्णी

Abstract

4.7  

अरविंद कुलकर्णी

Abstract

यंकट्राव

यंकट्राव

4 mins
912


  माझा बालमित्र आहे शंकर . बालमित्र म्हणण्या पेक्षा त्याला लंगोटयार म्हणणेच अधिक संयुक्तिक ठरेल . लंगोटयार म्हणजे दोघात एक लंगोट वापरणारे . हो आमची तेंव्हापासून ची मैत्री आहे व आजतागायत ती शाबुत आहे . मी आणि शंकर एकाच पाळण्यात झोपायचो . शंकर ची आई शकुंतला बाई या जि . प. शाळेत शिक्षिका होत्या व वडील व्यंकटराव टेलर होते . शंकर आमचा शेजारी राहायचा . मी दोन वर्षाचा असताना माझी आई वारली . मी लहान होतो शंकर ही माझ्याच वयाचा. शंकरच्या आई ला सर्वजण बाई म्हणत . बाई माझा खूप लाड करत . आम्हा दोघांना एकाच पाळण्यात झोपवून गाणे म्हणत . 

 शंकर चे वडील व्यंकटरावांना गल्लीतील सारे लोक यंकट्राव म्हणून हाक मारत . यंकट्राव एव्हाना साठी कडे झुकलेले असले तरी शरीराने मजबूत , उंच व धिप्पाड शरीर यष्टी चे होते . बत्तीशी गायब झालेली पण चेहेर्यावर एक वेगळेच तेज होते . अंगात मिल्ट्री टाईप स्वत:शिवलेला खाकी शर्ट , डोक्यावर खाकी टोपी कधी धोतर तर कधी पायजामा अशी त्यांची साधी वेशभूषा असायची . आमच्या किराणा दुकानात शेजारी त्यांचे टेलरींग फर्म होते . यंकट्राव हरहुन्नरी कलावंत , समाजसेवक , राष्ट्रसेवादलाचे कार्यकर्ते , अंधश्रद्धा निर्मूलन चे खंदे पुरस्कर्ते होते . गणेशोत्सवात दांडपट्टा खेळणे , लाठी फिरविणे . मशाल खेळणे हा तर त्यांचा आवडता छंद होता . खरंच व्यंकटराव म्हणजे एक झाकलं माणिक होते . लोकांना त्यांची किंमत कधी कळलीच नाही . आणि या गोष्टीचं वैषम्य ही त्यांना कधी वाटलं नाही . ते आपलं मस्तराम आयुष्य जगत राहिले . कोणी आपले कौतुक करावे , सत्कार करावा असे त्यांच्या कधी ध्यानीमनी ही येत नसे . 

 एकदा आमच्या गल्लीतला परटाचा रवी आमच्या कडे धापा टाकत आला . मी व शंकर विटीदांडू खेळत होतो . आम्हाला पाहून तो मोठ्या मोठ्या ने म्हणू लागला अरे पळा लवकर , दादा त्या माळ्याच्या बारवात पडलेत अन्य फुगून वर आलेत . रस्त्याच्या कडेलाच माळ्याची घरे आहेत व तिथे मोठी बारव आहे . आम्ही पळतच तिथे गेलो . पाहातो तर काय त्या बारवे भोवताली शंभर एक माणसे गोळा झालेली . सर्वजण आत डोकावून पाहात होते . ते दृष्य पाहून आमच्या तर पोटात गोळा च आला . मी व शंकर बारवे पाशी आलो . आत डोकावून पाहिले तर यंकट्राव मस्त मांडी घालून पाण्यावर शवासन करीत पडले होते . ते पाहून आमचा जीव भांड्यात पडला . मग गर्दीतून परटाच्या रव्याला ओढून आणला आणि असा धुतला की काही विचारू नका .

 पावसाळ्यात आष्टीच्या तलवार नदी ला पूर आला की यंकट्राव ला पोहायला जायची लहर यायची . नदीच्या दोन्ही तिरावर माणसे पूर पाहायला गर्दी करायचे . तिथे यंकट्राव कपडे काढून भरल्या नदीत शरीर झोकून देत असत . नदीच्या पुरातून या काठावरुन त्या काठावर व परत माघारी तितक्याच तडफदार पणे येत असत . तरुणाला ही लाजवेल अशी चपळाई त्यांच्या अंगात होती .  

 यंकट्राव स्वयंपाकात ही तरबेज होते . पुरणपोळी पासून ते पंचपक्वांना पर्यंत त्यांना सर्व स्वयंपाक येत असे . शिकरण म्हंटले की केळींच हे आपल्या ला माहिती आहे पण , पोपई च , पेरु च शिकरण आम्ही त्यांच्या हातचं खाल्लेलं आहे . त्यांनी केलेला सुधारस मला फार आवडायचा . आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सुधारस ही काय भानगड आहे . साखरेच्या पाकात लिंबू पिळले की झाला सुधारस तयार . त्या काळी कोणी पाहूणे आले घरी की हा पदार्थ ठरलेला असायचा . दुसरा पदार्थ म्हणजे पाहुण्यांनी खाऊ म्हणून आणलेली केळी . त्याच शिकरण करुन पाहुण्याला च खाऊ घालायचे आणि त्यांच्या बरोबर आपण ही खायचे. 

 यंकट्राव ला गाई पाळायचा ही छंद होता .  एकदा कसाबाला विकलेल्या गाई त्यांनी सोडवल्या होत्या व स्वत: सांभाळल्या होत्या . गाईच्या शेणाच्या गोवर्या ते स्वत: लावायचे . इतकेच नाही तर त्या वाळल्यावर त्याच्यावर खडूने नंबर टाकायचे . १, २ , ३ , ४ , ५ .अशी क्रमवारी देऊन . शकुंतला बाईंना सक्त ताकीद द्यायचे की आधली मधली गौरी उचलायची नाही . जसा क्रम लावला आहे तशीच त्याच क्रमाणे गौरी चुलीत गेली पाहिजे . शाळेच्या गडबडीत बाई शंकर ला गौर्या आणायला सांगत . शंकर कुठलीही गौरी आणून द्यायचा . मग बोलणी बाईंना खावी लागायची. मला नेहमी असा प्रश्र्न पडायचा की गौरी पहिल्या नंबर ची जाळली काय अन्य दहाव्या नंबर ची जाळली काय त्याची शेवटी राखच होणार मग असा का अग्रह करावा दादांनी ? पण हा प्रश्न मनातला मनातच राहायचा . त्यांच्या पुढे बोलायची कोणाची बिशाद नव्हती .  

 शंकर त्यांचा एकुलता एक मुलगा होता पण त्याचे फालतू लाड त्यांनी कधीच केले नाही . व्यायाम , पोहणे या बाबतीत त्याला प्रविण केले . पृकृती सुदृढ कशी ठेवावी हे शिकवले .


  अशा या हरहुन्नरी यंकट्राव चा त्यांच्या हयातीत योग्य सन्मान झाला नाही . याची खंत आजही वाटते . पण आजही ते कितीतरी जणांच्या हृदयात विराजमान आहेत .


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract