विंडो सीट
विंडो सीट
तीन वर्षा पुर्वी ची गोष्ट. आम्ही त्या वेळी अहमदनगर ला राहात होतो. माझी मोठी मुलगी पुण्यात कोथरूडला राहायची. मी अधन मधन तीच्या कडे येत जात असे. असेच एकदा तीच्याकडे दोन दिवस राहून नगरला येण्यासाठी निघालो. कोथरूड डेपोहून शिवाजी नगर बस पकडून शिवाजीनगर बस स्टाॅप वर घाई घाई उतरायला गेलो . बस च्या पायरी वरुन उडी मारुन उतरताना पाय लचकला. नगरी चप्पल ही तुटली . दिवाळी च्या सुट्ट्या लागल्या मुळे गाड्यांना तोबा गर्दी. पुणे - श्रीरामपूर गाडी लागलेली दिसली. एव्हाना तो लचकलेला पाय सुजत चालला होता . एका हातात बॅग , एका हातात तुटकी चप्पल घेवून आमचे ध्यान कसे बसे एस टी मधे चढले . भिरभिरत्या नजरेने जागा शोधू लागलो . एका ठिकाणी मोकळी जागा दिसली . चक्क विंडो सीट ! आधी बॅग त्या जागेवर फेकली मग मी लंगडत लंगडत त्या विंडो सीट वर जाऊन बसलो . पाय दुखत असताना ही गर्दीत जागा मिळने व तीही चक्क विंडो सीट ! त्या मुळे गड जिंकल्याचे समाधानात मी खिशातून हेडफोन काढला आणि डोळे झाकून मस्त गाण्यात गुंग होऊन गेलो . एव्हाना गाडी चालू झाली होती . एस टी खराडी बायपास च्या विनंती बस स्टाॅप वर थांबली . काही प्रवासी बस मधे चढले . गाडी सुरू झाली . एक विशाल काय महिला भली मोठ्ठी बॅग सावरत माझ्या दिशेने येत होती . ती महिला जवळ आल्यावर म्हणते , ओ मामा उठा ! माझी जागा आहे . मी शेजारच्या माणसाला म्हणालो , " मामा उठा तीचे रिझर्व्हेशन दिसतेय ". त्या महिलेच्या हातात रिझर्व्हेशन चा कागद होता . तो कागद माझ्यापुढे नाचवत ती अतिविशाल महिला मला म्हणाली . ते नाही तुम्ही उठा ! माझे सतरा नंबर सीट चे रिझर्व्हेशन आहे . अरे बापरे , ते ऐकून तर मला घामच फुटला . गाडीत उभे राहायला जागा नव्हती . त्यात माझा पाय सुजलेला . आता काय करायचं ? मी गयावया करु लागलो तसा त्या मॅडम ला अधिकच जोर चढला . शेजारचे प्रवासी ही स्त्री दाक्षिण्याचा आव आणून मला उठायला सांगू लागले . नाईलाजाने मी बॅग काढायला कॅरेज कडे पाहिले . उजव्या हाता कडे नजर गेली . माझ्या सीट च्या बाजूला लिहिले होते . " अपंगांसाठी" !
बस मी ते वाचले आणि बुडत्याला काडीचा आधार या म्हणीचा आधार घेऊन त्या अ. वि. महिलेला म्हणालो मी उठणार नाही . मग तर मोठा गोंधळ सुरू झाला . ती बाई चवताळून अंगावर आली . कंडक्टर ने हा गोंधळ ऐकून माझ्या कडे आला व माला म्हणाला ओ बाबा उठा ना राव चांगले सुशिक्षित दिसताय . त्या बाई ने रिझर्व्हेशन चा कागद कंडाक्टर कडे फडकवला . मीही कंडाक्टरला माझ्या सुशिक्षित पणाचा पुरावा दाखवला. माझ्या बाजूला लिहिलेला " अपंगांसाठी " हा बोर्ड दाखवला . कंडक्टर ते मानायला तयार नव्हता तो ही मला विंडो सीट वरुन उठवू लागला . ओ मॅडम बघू तो रिझर्व्हेशन चा कागद . अहो कंडक्टर सकाळी १०:२० च्या गाडीचं १७ नंबर चंद्र रिझर्व्हेशन आहे माझं हे बघा . कंडक्टर ने कागद हाती घेतला .
अहो बाई हे "पुणे - औरंगाबाद " गाडीचा रिझर्व्हेशन आहे आणि ही गाडी. " पुणे - श्रीरामपूर " आहे. उतरा उतरा उतरा , चांगल्या सुशिक्षित दिसता की ! गाडी चा बोर्ड वचून तरी बसावं . सगळ्या गाडीत काॅमेंट्स सुरू झाल्या होत्या . बाई आपली भली मोठ्ठी बॅग सावरीत गर्दीतून वाट काढत खाली उतरल्या . मी पुन्हा हेडफोन्स कानात अडकून गाणं ऐकू लागलो .