झुंबर
झुंबर


आयुष्यात काही प्रसंग काही घटना काही माणसे अशी येऊन जातात की त्या घटना ती माणसे आपली छाप कायमची ठेवून जातात. अशाच काही व्यक्ती ची छाप माझ्या मनावर बसली आहे . काही घटना माझ्या मनावर कोरल्या गेल्या आहेत. त्या व्यक्ती सर्वसाधारण असतील पण त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांमुळे त्या कायम स्मरणात राहतील. त्यातलेच एक पात्र आहे आष्टीचा *झुंबर*
माझा जीवलग मित्र निशिकांत आपेगांवकर च्या घरी झुंबर डोमकावळे ही व्यक्ती कामाला होती. पाणी भरणे हे त्याचे मुख्य काम. दोन्ही पायाला कुरपे असल्यामुळे झुंबर टाचा उंच करुन पंजावर चालायचा .
दाढीचे खुंट वाढलेले , पायात जाड वाहाना, डोक्यावर ची तेलाचे डाग पडलेली कधी काळी पांढरी असलेली टोपी तो तिरकस तरी घालायचा किंवा दादा कोंडके स्टाईल असायची. पायजामा , आणि शर्ट कायम मळलेले , सण वार असेल तर *सनलाईट* साबन आणून आख्खी साबन खलास करुन कपडे स्वत: च धुवायचा . तेलकट रापलेला चेहरा नेहमी स्वत: शीच काहीतरी बोलायची त्याची सवय .मी व निशी गप्पा मारताना आमच्या मधे सहभागी व्हायचा . विषय कोणता ही असो तो आपले मत मांडायचा स्वत: च जोक करुन गालातल्या गालात हसायचा.
आमच्या लहानपणी आष्टीला पाण्याचे फार दुर्भिक्ष होते. झुंबर कावडीने पाणी आणायचा. बांबू च्या दोन्ही कडेला दोन गज अडकवून त्याला दोन डबे जोडून कावड केलेली असते . डबे भरून कावडीला अडकवून तो ती खांद्यावर घेऊन यायचा. चालताना त्या कावडीचा कर् $$क$र् कर् $$ असा आवाज यायचा. झुंबर ची बायको खरेच समाधानी होती . द्रोपदा तिचं नाव . राहाणीमान झुंबर च्या अगदी उलट . स्वच्छता , टापटीप तिला आवडायची . अंगावरचे वस्त्र फाटके असतील पण मळके तीला आवडायचे नाही . दिसायला गोरीपान , नाकी डोळी नीटस होती . पडेल ते काम करुन संसाराला हातभार लावायची . आपल्या फाटक्या संसाराचा तिला कधी वैताग आला नाही . नवर्या बरोबर कधी भांडत बसली नाही . दोन लहान मुलांच्या संगोपनासाठी ते नवरा बायको रात्रंदिवस कष्ट करीत असत .
कधी कधी आम्ही संध्याकाळी फिरायला जायचो. झुंबर ही आमच्या बरोबर असायचा . खंडोबाच्या देवळाकडे किंवा लिमटका येथे आमची बैठक बसायची. गाणे , भेंड्या , विनोद व्हायचे. आम्ही झुंबर ला गाण्यासाठी आग्रह करायचो. तोही त्याची आवडती गौळण म्हणायचा. "नेसले ग बाई चंद्रकळा टिपक्याची, तिरपी नजर माझ्यावर या सावळ्या किस्नाची.
हे गाणे म्हणताना त्याचा एक डोळा बारीक होई. आवाज जस जसा टीपेला जाईल तसतसा बारीक होई फक्त तोंड उघडे .... आवाज गायब . मग उरलेल गाण आम्ही कोरस देऊन पुर्ण करायचो.
आष्टीचे दिवस आठवतात , माणसे आठवतात आणि त्या आठवणी कागदावर लिहिण्यासाठी आपसूकच लेखणी हाती येते.