एक डाव भुताचा
एक डाव भुताचा


१९ ८२ ची गोष्ट ! मी कुष्ठरोग तंत्रज्ञ म्हणून जामखेड च्या डॉ. रजनीकांत आरोळे यांच्या ग्रामिण आरोग्य प्रकल्प जामखेड येथे रुजू झालो. त्यांनी मला कर्जत तालुक्यातील चिंचोली काळदात येथील सब सेंटर वर पोस्टींग दिली. मी त्यावेळी सिंगल होतो . लग्न वगैरे झाले नव्हते. ते सब सेंटर एका माळावर होते. गावापासून दूर पण जामखेड कर्जत रोड वर होते. सबसेंटर ला दोन क्वार्टर व एक कन्सल्टिंग रुम एवढस ते सबसेंटर . एका क्वार्टर मधे सिस्टर , एका क्वार्टर मधे डाॅक्टर व मी सिंगल असल्यामुळे आमची पथारी कन्संलटिंग रुम म्हणजेच दवाखान्यात.
तिथे पेशंटसाठी तपासणी टेबल , डाॅक्टरसाठी टेबल खुर्ची , व समोर पेशंटसाठी दोन काॅट !
मी तिथे रुजू होऊन एक महिना झाला असेल .
रात्री मी व दवाखान्याचा वाॅचमन. भाऊ ऊबाळे आम्ही दोघे बाहेरच्या पटांगणात अंथरुण टाकून झोपत असू.
थंडीचे दिवस होते. दुसऱ्या दिवशी रविवार ची सुटी होती . मला सकाळी लवकर उठायची घाई नव्हती . मी भाऊ ला म्हणालो उद्या सुट्टी आहे . मी दवाखान्यात झोपतो म्हणजे जरा उशीरा उठता येईल. तो बरे म्हणाला . पण तुम्ही आतून कडी घालू नका मी च बाहेरुन कडी घालतो म्हणजे मला सकाळी दार उघडायला सोपे.
मी आत आलो . भाऊ ने बाहेरुन कडी घातली. काॅटवर ची गादी फाटलेली होती. पलीकडे तीन चार गाद्या पडलेल्या होत्या . त्यातून एक चांगली गादी घेऊन ती बदलून काॅटवर टाकली . आणि काॅटवर अंग टाकलं.
रात्रीचे दोन अडीच चालू सुमार ........
एकदम माझ्या छातीवर कोणी तरी येऊन बसले ..
माझ्या गळ्यावर दोन्ही हाताने घट्ट दाबू लागले. आज चाळीस वर्षा पेक्षा ही जास्त काळ होऊन गेला पण गळ्या भोवतीची ती घट्ट पकड आजही मला स्पष्ट आठवते आहे.
छातीवर चा दाब वाढू लागला.....
गळ्याला फास बसू लागला....
जिवाच्या आकांताने ओरडायचा प्रयत्न करत होतो पण आवाज फुटत नव्हता.
हातपाय हलवायचा प्रयत्न करत होतो पण हातात पायातल बळच नाहीसं झालं होतं.
सर्व प्रयत्न फोल ठरले होते... आता आपला शेवट होणार असं वाटलं होतं...
चला घ्या देवाच नाव ....
मनातल्या मनात सुरू केलं
रा.. म... रा.... म.... रा... म.... जय ... श्री.. राम...
आणि काय आश्चर्य ...
गळ्यावरची पकड ढिली पडली .
छातीवरचा दाब कमी झाला....
मी हळू हळू डोळे उघडले.. सभोवार पाहू लागलो . मला वाटले कि एखादा चोरच आपल्या खोलीत शिरला की काय ? पण खोलीत तर माझ्या शिवाय कोणी नव्हते.
ऐन थंडीच्या दिवसात मला घाम फुटला होता. घशाला कोरड पडली होती. आवाज निघत नव्हता . भाऊ ने दाराला बाहेरुन कडी घातली होती.. माझी भितीने गाळण उडाली होती.. कसाबसा दाराशी गेलो दार जोरजोरात हलवून दाराला धक्के मारुन भाऊ ला जागे केले .. त्याने दार उघडले त्या बरोबर घामाने लथपथ झालेला मी त्याला घट्ट मिठी मारली . त्याने पाणी प्यायला दिले . मला शांत केले.
दुसऱ्या दिवशी भाऊ ने मला विचारले , कुलकर्णी तुम्ही गादी बदलली का ?
मी म्हणालो हो . पहिली फाटकी होती म्हणून बदलली . भाऊ म्हणाला , अहो तुम्ही जी गादी झोपायला घेतली होती त्या गादीवर पेशंट मेला होता........