Alka Jatkar

Romance

3  

Alka Jatkar

Romance

व्हॅलेंटाईन डे

व्हॅलेंटाईन डे

2 mins
10K


रखमा रश्मीताईंच्या घरी कामासाठी पोहोचली तेंव्हा रश्मीताई आवरून तयारच होत होत्या. आज फक्त मुलांसाठी स्वयंपाक कर ग ...आम्ही दोघे लंचला बाहेर जातोय. आज व्हॅलेंटाईन डे आहे ना?

छानशी साडी नेसून, साहेबांनी भेट म्हणून दिलेला डायमंड सेट घालून ताई बाहेर आल्या आणि आम्ही पण येणार म्हणून मुलांनी एकच गलका केला. "नाही हं असा हट्ट करायचा. आज व्हॅलंटाईन डे आहे ना म्हणून आम्ही दोघेच जाणार आहोत. रखमा तुम्हाला हवं ते करून देईल हं खायला." रश्मी मुलांना समजावत म्हणाली. पण मुले काही फार खुश नाही झाली. बाबांच्या भीतीने गप्प बसली इतकेच.

बोलता बोलता रश्मीने रखमाला विचारले "तू काय केलंस ग व्हॅलेन्टाईन डे साठी?"

"त्ये काय असतंय?" रखमाने बावचळून विचारले.

" अग, व्हॅलेंटाईन डे ला ..." रश्मी सांगत असतानाच साहेबांचा जरा रागावूनच आवाज आला "चला लौकर.सारे आटोपून मला ऑफिसला जायचेय.कामे खोळंबली आहेत."

" जाऊदे रखमा. तुला कळून तरी काय उपयोग आहे?" जरा तुच्छतेनेच म्हणत रश्मी साहेबांबरोबर बाहेर पडली.

" व्यालेंटीन " विसरू नये म्हणून तो शब्द सारखा मनाशी म्हणत रखमाने ठरवले नवऱ्यालाच विचारू हे काय आहे ते.

कामे आटोपून संध्याकाळी रखमा घरी परतली तेंव्हा तिची मुले भुकेजून तिची वाटच पाहत होती. भराभरा रखमा स्वयंपाकालाच लागली. गरमागरम भाकरी आणि कालवण खाऊन मुले तृप्त झाली तेंव्हा टोपलीत तीनच भाकरी असल्याचे रखमाच्या लक्षात आले.

मुलांची ताटे उचलून ती व तिचा नवरा श्रीपती जेवायला बसले. दिवसभर काम करून दोघांनाही सणकून भूक लागली होती. एक एक भाकरी वाढून घेऊन त्यांनी जेवण सुरु केले. आपली एक भाकरी संपताच रखमा म्हणाली " माझं पोटच भरलं बघा.आज कामावर खाणं झालंया. ताईंनी दिलं होत वाढून. उरलेली भाकर तुमी घ्या."

श्रीपतीला माहित होते रखमा कधीच कामावर काही खात नाही ते. जे काय मिळेल ते मुलांसाठी आणते बांधून. तोही मग ढेकर देत बोलला "मलाबी भूकच न्हाई बघ. आज वडापाव खाल्ला न्हवं दोस्तांसंग."

रखमाच्याही लक्षात आले आपण भाकरी खावी म्हणून बोलतोय श्रीपती. तो कधीच एक रुपया पण खर्च करत नाही बाहेर. शेवटी दोघांनीही एकमेकांना तू खा...तू खा चा आग्रह करत अर्धी अर्धी भाकरी घ्यायची ठरवली. भाकरी खाताना एकदम रखमाला आठवले आणि ती श्रीपतीला म्हणाली "आवो त्ये व्यालेंटीन का काय त्ये काय असतंय?"

श्रीपती गोंधळून म्हणाला "काय कि बॉ ? सिरीमंतांचं असेल काय तर. जाऊ द्ये आपल्याला काय करायचंय."

शेवटी व्हॅलेंटाईन म्हणजे काय हे न कळताच दोघे सुखदुःखाच्या गोष्टी करत आनंदाने जेवू लागले.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance