Pandit Warade

Drama Romance Tragedy

3.0  

Pandit Warade

Drama Romance Tragedy

उष्टावळ

उष्टावळ

7 mins
93


   राजू! रखमाचा एकुलता एक मुलगा. बाप गेल्यानंतर रखमानं लाडात वाढवलेला. पोटाला चिमटा घेऊन खूप शिकवलेला. रखमाला आता त्याच्या लग्नाची चिंता सतावत होती. 


  राजुच्या मामाचीच मुलगी पुष्पा लहान पणा पासून बघितलेली होती. घरकाम, शेती कामात तरबेज असणारी पुष्पा जशी वयात आली तेव्हा पासून रखमानं, सून करून घ्यायचं निश्चित केलेलं होतं. राजूचं शिक्षण पूर्ण झालं आणि रखमानं राजुच्या मागं लग्नासाठी टुमणं लावलं होतं.


  "आई, आताच तर माझं शिक्षण पूर्ण होतंय. लगेच का मला लग्नाच्या बेडीत अडकवू बघतेस? मला जरा मोकळ्या मनानं हिंडू फिरू दे. पोटापाण्याचं बघू दे. एखादी छोटी मोठी नोकरी बघू दे. मग बघू लग्नाचं." राजू टाळाटाळ करत होता. तशी रखमा जीवाला खायची. राजू सहा महिन्यांचा होता तेव्हाच त्याचा बाप वारला होता. रखमानं अतिशय लाडात राजूचं संगोपन केलं होतं. लोकांच्या शेतात दिवसभर रोज मजुरी करायची, आलेल्या मजुरीवर तिचं आणि राजूचं पोट कसंतरी भरायचं. त्यातूनच थोडेफार पैसे वाचवून ठेवायचे, राजुच्या शिक्षणासाठी खर्च करायचे. खूप हलाखीत दिवस काढले. आता एकच आशा राहिली होती, राजूचं लग्न आणि नातवाचं तोंड पाहणं. परंतु राजू काही मनावरच घेत नव्हता. रखमा अगदीच बेचैन झाली होती.


   "देवा, मला मेलीला तरी कशाला ठिवलंस रं बाबा? दादला नेल्हा तव्हाच मला बी नियाचं ना. लोकायच्या शेतात रोज मजुरी करायची, मिळल त्ये खायाचं, आन् जसं जमलं तसं पोराला शिकवायचं. कशापायी? ह्येच्यासाठी? आता कुठं चार घास सुखानं खाईन म्हणत्ये तर त्येबी नशिबात दिसत न्हाई. एवढं जीव तोडून सांगत्ये पर पोरगं आयकल तर ना. व्हऊ दे त्येच्या मना परमाणं. मला एकदाचं उचल बाबा इथून." तिचा वैतागलेला सूर ऐकून राजूही गार झाला होता.


  "आई, असं का बोलतेस गं? तुझ्या शिवाय माझं तरी कोण आहे या जगात? तुझं असं निर्वाणीचं बोलणं ऐकून माझा धीरच खचतो गं. बस एक छोटी मोठी नोकरी मिळाली की तू म्हणशील तेव्हा, तू म्हणशील त्या मुलीसोबत मी लग्न करायला तयार आहे." त्यानं असं म्हटलं की तिला आतून बरं वाटायचं. 


  "शाना गं माझा राज्या! लवकर बग रं बाबा नवकरीचं. कधी एकदा सून घरात यिती आन म्या आयतं तिच्या हातचं खाते आसं झालंय मला." असं म्हणत तिनं त्याच्या तोंडावरून हात फिरवत कडा कडा बोटं मोडली होती. 


  आणि एक दिवस रखमाचं नशीब फळफळलं, हो रखमाचंच म्हणावं लागेल, राजुला नोकरी मिळाली अन् रखमाला आकाश ठेंगणं झालं. तिनं लगेच भावाच्या, बापुरावच्या कानावर ही गोष्ट टाकली. भावाची मुलगी पुष्पां वयात आली होतीच. राखमानं थेट मागणीच घातली. एकुलता एक भाचा, शिकला सवरलेला. दिसायला सुंदर, शिवाय आता नोकरीलाही लागलेला. नाही म्हणण्यास काही कारणही नव्हते. 


  पुष्पा! बापुरावची एकुलती एक मुलगी. सुंदर होतीच शिवाय तिला लहानपणा पासूनच कराटेची आवड असल्या मुळे शरीर पिळदार आणि घोटीव होते. जरी बापाची लाडकी असली तरी शब्दाबाहेर नव्हती. त्यामुळे तिने बाप म्हणेल त्यास त्वरित होकार दिला. 


   नोकरीला सहा महिने झाले आणि रीतसर राजूचं पुष्पा सोबत लग्न झाले. लग्न धुमधडाक्यात झालं. नवरी घरी आली. मूळ पाटी, मांडव परतणी झाली. देवदेवता झाले. नवरी येती जाती झाली. सत्यनारायण पूजा झाली.


  पुष्पाची चुलत बहीण, राजुची मावस बहीण या थांबलेल्या होत्या. त्यांनी या नवदाम्पत्याच्या मधुचंद्राची तयारी केली. त्यांची स्वतंत्र खोली फुलांनी सजवली. बिछाना सजवला. दोघांना सायंकाळी सुगंधी उटणे लावून स्नान घातले. जेवण झाल्या नंतर थोडा वेळ गाण्याचा कार्यक्रम झाला. नवरीला तिच्या खोलीत नटवून बसवले. बाजूच्या चौरंगावर केशरयुक्त दुधाचा ग्लास, त्रयोदशी पान विडा ठेवलेला होता. पुष्पा सलज्ज होऊन राजुची आतुरतेने वाट पहात बसलेली होती. बाहेरचा गाण्यांचा कार्यक्रम आटोपला सर्वजण पांगले. मामे बहीण आणि मावस बहिणीने राजुला जवळ जवळ ढकलतच त्या खोलीत आणून सोडले. त्यानेही उगाच आढेवेढे घेत घेतच खोलीत प्रवेश केला. आत गेल्या वर मात्र हळूच आतून कडी लावून घेतली. मंद स्मित करत हलकेच शीळ घालत तो पलंगाजवळ गेला. हळूच तोंडावरचा बुरखा दूर केला. आणि... नुसता पहातच राहिला. लहान पणा पासून पाहिलेली पुष्पां आज अगदीच नवीन दिसत होती. जणू स्वर्गीची एखादी अप्सराच पृथ्वी वर अवतार घेऊन आली की काय असे वाटत होते. तिने हळूच त्याच्या हातात दुधाचा ग्लास दिला. त्यानेही तो एक दमात रिकामा केला. तिने पानांचा त्रयोदश विडा आपल्या कोमल हातांनी त्याच्या तोंडात घातला, त्याने कचकन तिचे एक बोट दाताखाली दाबले. 


  'आई गं sss अहो असं काय करताय?' हळू आवाजात चित्कारत तिने बोट सोडवून घेतले.  


   "माझी इस्टेट आहे ही, मला वाटंल तशी वापरीन." तोही अगदीच हळू आवाजात उत्तरला. 


  "अहो. पण खूप दुखलं ना बोट. इस्टेट तुमचीच आहे पण जरा सबुरीनं घ्या की." ती त्याला सबुरीचा सल्ला देत होती परंतु स्वतःही अगदीच उतावीळ झाली होती. बराच वेळ दोघांमध्ये असे हलके फुलके विनोद झाले, गप्पा झाल्या आणि मधुचंद्र साजरा करण्यासाठी बिछान्यात शिरले. त्याने हळुवारपणे तिच्या अंगांगावरून मोरपिसा प्रमाणे बोटं फिरवायला सुरवात केली. ती उत्तेजित होत गेली, तो ही उत्तेजित झालाच होता. त्याने हळूच तिच्या ओठांचे चुंबन घेतले आणि तिला आपल्या दणकट बाहूत ओढून घेतले. दुसऱ्याच क्षणी तो विजेचा धक्का बसल्या प्रमाणे तिच्या पासून दूर झाला. काय झाले ते तिला कळलेच नाही. 


  "घात झाला, घात. माझी फसवणूक झाली." तो जवळ जवळ किंचाळलाच पण हळू आवाजात. 


   "अहो, असं काय म्हणताय? कुणी फसवलं तुम्हाला?"


   "तू ss तू ss ! तू फसवलंस मला. तू कुमारी नाहीस. तुझं कौमार्य भंग झालेलं आहे." तो रागात बोलत होता. 


   "नाही हो मी अगदी धुतल्या तांदळा सारखी स्वच्छ आहे. कुणाची शपथ घेऊ? मी आजवर स्वप्नातही कधी परपुरुषाचा विचार केला नाही. तुम्ही गमतीतही असा आरोप करू नका. शील हेच आम्हा स्त्रियांचं लेणं असतं, मौल्यवान दागिना असतो. त्याच्यावर कलंक कुठलीही स्त्री सहन नाही करू शकत. खरंच सांगा, तुम्ही गंमत करताय ना माझी?" ती अंगचटीला येत म्हणाली. तसं त्यानं तिला झिडकारलं आणि पाय आपटत दुसऱ्या खोलीत जाऊन बसला. ती मुळुमुळू रडत बसली. 


  रात्रभर दोघेही आपापल्या खोलीत तळमळत जागेच होते. सकाळी उठल्या बरोबर त्याने मामे बहीण, मावस बहीण आणि आईच्या समोर आपली कैफियत मांडली. 


 "हा माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. माझी फसवणूक झालीय. मला उष्ट्या पत्रावळीवर जेवायला लावताय. माझ्या आयुष्याचा असा खेळ करू नका. का? का असा छळ करताय माझा? मला ती नकोय. तिला मी आजच मोकळी करत आहे. तिला तिच्या माहेरी नेऊन सोडा. मला माझ्या नोकरीला जाऊ द्या." राजू तावातावाने सांगत होता.


  "बाळा, झालं तरी काय आसं?" रखमा समजावणीच्या सुरत विचारत होती. "मला तर मेलीला डोळं मिटले तर बरं आसं झालंय. देवा उचल रं बाबा लवकर." तिला एकीकडे भाऊ दिसत होता तर दुसरीकडे मुलगा दिसत होता. मधल्यामध्ये तिच्या जीवाची होरपळ होणार होती. तिच्या मनाची घुसमट होणार होती. ती छाती झोडायला लागली. 


  तशी पुष्पाची चुलत बहीण रेश्मा जवळ आली, "आत्या, असं काय करताय? काही झालं नाही. भावोजी गंमत करताहेत. होय ना हो भावोजी?" तिने हळूच कुसुमला राजुच्या मावस बहिणीला इशारा केला आणि राजुला घेऊन जायला सांगितलं. 


  कुसुम राजुला घेऊन त्याच्या खोलीत गेली. 


  "दादा, काय झालं एवढं चिडायला? का असा चिडलाहेस? वहिनीने जवळ नाही का येऊ दिलं?कोणतीही मुलगी पहिल्यांदा नवऱ्याजवळ यायला अशीच लाजत असते." तिने हळुवारपणे विचारलं.


  "ती काय जवळ येऊ देणार नाही? ती तर आतुर होती. तिला अगोदरचीच सवय आहे अशा गोष्टीची."


   "दादा, असं एकदम कुणाच्याही लेकीबाळीवर असा आरोप करणं बरोबर नाही. शिवाय ती मामाची पोर आहे. लहानपणापासून बघण्यातली आहे. तिच्या विषयी असं बोलणं शोभतं का? तुला आवडली नाहीं का ती?"


  "ताई, अगं तिचं कौमार्य भंग झालेलं आहे आधीच. गरीब भाचा म्हणून दिली माझ्या गळ्यात बांधून. मला नकोय ती." तो निर्वाणीचं बोलत होता. त्याचे म्हणणे ऐकून कुसुमही हबकलीच. 


   इकडे रेश्मा आणि रखमा उठून पुष्पाच्या खोलीत गेल्या. ती मुळुमुळू रडत होती. रात्रभर रडत राहिल्याने तिचे डोळे सुजले होते. डोळ्यातले अश्रू संपले होते. कोरड्या डोळ्याने ती भिंतीकडे नजर लावून बसलेली होती. तिला या दोघी खोलीत आल्याची चाहूलही लागली नाही. रखमाने पाठीवर हात ठेवला तशी ती एकदम दचकली आणि रखमाला पाहिल्यावर तिच्या गळ्यात पडून तिने, "आत्या ssss " असा मोठ्याने हंबरडा फोडला. रखमा, रेश्माने तिला रडून मोकळे होऊ दिले.


  "आत्या, मला जहर देऊन मारून टाका पण असा भलता सलता आरोप करू नका. मला कुणाचीही शपथ घ्यायला सांगा. माझ्या हातून काहीही चूक झालेली नाही." ती कळवळून सांगत होती. 


  रेश्माने तिचं ऐकून घेतलं. ती निष्कलंक आहे याची दोघींनाही खात्री झाली होती. पण राजुला कसं समजवायचं? रखमाने जग बघितलेले होते. जगातले टक्के टोनपे तिला माहीत होते. तिने मनाशीच काहीतरी निश्चित केले. पुष्पाला घेतले. किचनमध्ये आणलं. रेश्माला चहा ठेवायला सांगितला. कुसुमलाही आवाज दिला. राजुला चहा घ्यायला बोलवायचं सांगितलं. तो आल्यावर....


  "चहा घे. तुझ्या मनासारखं होईल." असं म्हणत रखमा उठली. अन् दुसऱ्या खोलीत गेली. सर्वांचे चहाचे कप भरले. रखमाचाही कप भरला होता. सर्वांनी आपापले कप उचलले. सर्वांचा चहा पिऊन झाला. मात्र रखमाचा कप तसाच राहिला. 


  आत्या चहा घ्यायला आली नाही म्हणून रेश्मा तिला पहायला गेली. तिने खोलीत डोकावून पाहिले अन् जोरात ओरडली,


  "भावोजी sssss, आत्याला काय झालं?" आणि "आत्या sss" म्हणत ती रखमाचा जवळ गेली. रखमा अस्ताव्यस्त अवस्थेत पडलेली होती. तिच्या तोंडाला कसला तरी उग्र दर्प येत होता. राजू, कुसुम आणि पुष्पा तिघेही धावत आले. राजुने मित्राची गाडी बोलावली आणि रखमाला गाडीत टाकून लगेच हॉस्पिटल गाठले. 


   "आई, डोळे उघडा. काही झालं नाही तुम्हाला. आता ओके होता बघा तुम्ही." डॉक्टरने एक गोळी करिक पावडर करून पाण्यात प्यायला दिली. रखमाने एक उलटी केली. उलटीलाही उग्र वास येत होता. तिने हळूच डोळे उघडले अन् डॉक्टरकडे पाहून इशाऱ्याने काहीतरी सांगितले.


 डॉक्टरच्या सांगण्या नुसार सर्वजण बाहेर गेल्यावर रखमाने सर्वकाही सविस्तर सांगितले. आणि पुष्पाच्या कौमार्यभंगा बाबत शंका निरसन करून घेतले.


 रखमाने केलेलं नाटक चांगलंच वठलं. तिला सुटी देतांना डॉक्टरने औषधीच्या सूचना देण्यासाठी राजूला केबिनमध्ये बोलावले आणि सविस्तर सांगितले. 


   "राजू, अरे स्त्रीचा योनी पटल फाटला म्हणजे तिचं कौमार्यभंग झालं असं नसतं. योनी पटल अनेक कारणांनी फाटू शकतो. अति मेहनत, ओझे उचलणे, किंवा अशाच तत्सम कारणांनी पटल फाटणे शक्य आहे. त्यातल्या त्यात तुझी पत्नी लहान पणा पासून कराटे शिकते, खेळते. त्यामुळेही तिचे पटल फाटलेले असू शकते. एवढ्याशा साध्या गोष्टीने डोक्यात राख घालून घेऊ नकोस. स्वतःच्या आणि तिच्या आयुष्याचं असं वाटोळं करून घेऊ नकोस. तिचा निरागस चेहरा बघ. अरे, त्या तसल्या मुलींच्या चेहऱ्यावरचा नाटकी भाव तेव्हाच ओळखता येतो. डोळ्यातला अपराधी भाव त्यांना कधीच लपवता येत नसतो. जा मोकळ्या मनाने तिच्याशी बोल. ती तुझीच आहे केवळ तुझीच आहे हे मी माझ्या अनुभवा वरून ठामपणे सांगू शकतो. 


  डॉक्टर कडून बऱ्याच गोष्टींचं निरसन झालं. राजू पुष्पाचा संसार व्यवस्थित सुरू झाला. परंतु अजून ही कधी कधी राजुच्या मनात संशयाचा कीडा वळवळायला लागतो आणि मनाची घुमत व्हायला लागते. कधी तरी असा प्रसंग येतो आणि रखमा, पुष्पा, आणि राजू तिघांच्याही मनाची घुसमट व्हायला लागते.

*******


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama