उर्वशी - शेवटचा भाग
उर्वशी - शेवटचा भाग
इकडे शंभू हे सर्व पाहत होता. त्याला स्वामी ध्यानानंद सर्व दाखवत होते. जे गाव पूर्वी ठाकुरांचे होते तेच आताचे माधवपूर आहे. उर्वशी कधी त्या गावातून बाहेर गेलीच नव्हती. ती त्या जुन्या हवेलीतच होती. ती सरपंचांना भेटणे हेही एक खोटेच होते. सरपंचांच्या हातून त्या हवेलीवर राजवर्धन यांनी घातलेले बंधन तुटले होते आणि उर्वशी मुक्त झाली होती. राजवर्धन त्यांच्या माणसांना जळू शकले नाहीत. त्यांनी फक्त हवेलीच्या सर्व खिडक्या उघडून टाकल्या आणि तळघरचा दरवाजा विभूतीने बंद केला . जर उर्वशी आणि तिच्या साथीदारांना रक्त मिळाले नाही तर ते नष्ट होतील. असे त्यांना वाटले. त्यांनी गावातल्या घरातील लोकांनाही उन्हात आणून ठेवले. थोड्याच वेळात लोकांचा आक्रोश त्यांना ऐकू आला. सवजण उन्हात कापरासारखे जळू लागले. राजवर्धन यांच्या घरच्या माणसांचीही तीच अवस्था झाली. सर्वजण जाळून राख झाले. ही सर्व हिंसा सहन न होऊन राजवर्धन यांनी स्वतःला जाळून घेतले.
ही सर्व हकीगत समजल्यावर शंभू माधवपूरकडे जायला निघाला. स्वामी ध्यानानंद त्याच्या सोबत होतेच. मजल दरमजल करत शंभू माधवपूर गावात आला. सर्वप्रथम शिवालयाजवळ असलेल्या तलावावर तो गेला. त्याने मंत्र म्हणून आपल्याजवळची पवित्र विभूती पाण्यात टाकली आणि शंकराची प्रार्थना केली. तास पाण्याचा लालसर काळा रंग बदलून पूर्वीसारखा निळा झाला. पाणी पहिले होतं तसं नितळ झालं. शंभूने त्या तळ्यात अंघोळ करून त्या पाण्याने शिवालयात जाऊन शिवाला अभिषेक केला आणि हात जोडून आपल्याला यश देण्याची प्रार्थना केली. इकडे सरोवराचे पाणी नितळ झाले आणि उर्वशी दचकली. कोणत्यातरी पवित्र शक्तीचा गावात प्रवेश झाला आहे याची तिला जाणीव झाली. तिच्यामुळे आपल्याला धोका होऊ शकतो हे तिला जाणवले. काळोख पडल्यावर ती तिच्या साथीदारांना घेऊन निघाली.
शिव मंदिराच्या व्हरांड्यावर शंभू ध्यान लावून बसला होता. उर्वशी आपल्या दिशेने येत आहे याची त्याला जाणीव झाली. उर्वशीने मंदिराजवळ आल्यावर शंभूला भुलवण्यासाठी मोहक हालचाली करण्यास सुरवात केली ती तिच्या सौंदर्याचा पुरेपूर वापर करत होती. तरीच शंभू भुलत नाही म्हटल्यावर तिने त्याला घाबरवण्यास सुरवात केली. शंभू त्या माकडचेष्टांना बळी पडणारा नव्हता. ते देवळाच्या आवारात येऊ शकत नाहीत हे त्याला माहित होते. मग त्यांच्याकडे पाठ फिरवून तो निघाला आणि देवळात जाऊन झोपला. दुसऱ्या दिवशी त्याला भरपूर काम करायचे होते. दसऱ्या दिवशी सकाळी पूजा करून आणि गुरूंचे स्मरण करून तो निघाला. सर्व घरांमधील लोकांना त्याने ओढून बाहेर आणले आणि घराची दारे विभूतीने बंद केली. ऊन अंगावर पडताच लोक कापरासारखे जळू लागले. जळताना त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान होते. शेवटी
शंभूच्या हातून त्यांना मुक्ती मिळत होती. मग तो हवेलीकडे निघाला. हवेलीच्या आसपासचे वातावरण अतिशय भयानक आणि उदास होते. वृक्ष असूनही त्यावर एकही पक्षी नव्हता. जिवंतपणाची कोणतीच खूण तिथे नव्हती.
मग तो हवेलीत गेला हातात शिवमंदिरातील पवित्र त्रिशूळ घेऊन. खूप शोध घेतल्यावर त्याला तळघर सापडले. एकेकाळच्या सुंदर हवेलीची अगदी दुर्दशा झाली होती. त्याला ते पाहून खूप वाईट वाटले. मग त्याने हवेलीच्या तळघरात प्रवेश केला. तिथल्या दुर्गंधाने त्याला ओकारीचा हमका आला. एक एक करत तो पायऱ्या उतरून तळघरात गेला. तिथे त्याने उर्वशी विश्रांती घेत असलेल्या पेटीचे द्वार उघडले. तिचे डोळे उघडे होते. त्यातील हिंस्त्र भाव पाहून तो दोन पावले मागेच सरला. मग धीराने पुढे जाऊन त्याने हातातील त्रिशूल तिच्या छातीत खुपसला. तिच्या चेहऱ्यावर आधी क्रूर आणि मग विवश भाव आले आणि ती मृत झाली. आता हिचे शरीर मानवी होते. ती तानी होती आणि तिच्या सुंदर चेहऱ्यावर अपार शांती होती. मग शंभूने तिच्या सर्व साथीदारांनाही त्रिशुळाने मारले.
मग एक एक करत त्या सर्वाना बाहेर आणले. हवेलीच्या आवारात दाट झाडीमुळे ऊन पोहोचत नव्हते. मग त्याने झाडाच्या वाळलेल्या फांद्या गोळा करून एक मोठी चिता रचली. आणि उर्वशी आणि तिच्या दहा साथीदारांना मंत्राग्नी दिला. त्यांना अग्नी देताच वातावरण एकदम मोकळे झाले. पवित्र वाटू लागले. सुगंधित हवा वाहू लागली. शिव मंदिरात घंटा वाजू लागल्या. शंभूने झोळी उघडली त्यात ठाकुरांचे पारंपरिक देव होते. जे त्याला मृत्यूपूर्वी त्याच्या साधूबाबांनी दिले होते. आता शंभू तिथेच राहणार होता शिवालयात. जसा तो मागील जन्मी राहत होता.तो कोण आहे हे त्याला समजले होते. मागच्या जन्मी अर्धवट राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी राजवर्धन शंभूच्या रूपात आले होते.
(समाप्त)